नूलच्या सानिका मानेचा निर्णायक गोल, भारताला सलग तिसरे ज्युनियर आशिया कप विजेतेपद
कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावच्या सानिका मानेने चीनविरुद्धच्या अंतिम सामन्यात १७व्या मिनिटाला गोल करत भारताला महिला ज्युनियर आशिया कप २०२६ मध्ये विजेतेपद मिळवून दिले.
चीनमध्ये सुरू असलेल्या महिला ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान चीनवर १-० असा विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. या विजयाची नायिका ठरली ती कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा नूल गावातून आलेली सानिका चंद्रकांत माने. सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये १७व्या मिनिटाला सर्कलमध्ये आलेला लांबलचक पास हेरून तिने वेळ न दवडता अचूक फटका मारला आणि चेंडू थेट गोलजाळ्यात गेला. या एका गोलने भारताला १-० अशी आघाडी मिळाली, जी अखेरच्या शिट्टीपर्यंत टिकवली गेली.
सामन्याचा पहिला क्वार्टर दोन्ही संघांनी चुरशीने खेळला आणि तो गोलशून्य बरोबरीत सुटला. सानिकाच्या गोलनंतर चीनने बरोबरी साधण्यासाठी वारंवार हल्ले चढवले, पण भारतीय बचावफळीने प्रत्येक हल्ला मोडून काढत विजय कायम राखला. या दमदार कामगिरीसाठी सानिकाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा (प्लेअर ऑफ द मॅच) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सानिकाला खेळाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिची आई ज्योती याही पूर्वी राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळल्या आहेत, तर मोठी बहीण कृष्णानेही राष्ट्रीय पातळीवर हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वडील चंद्रकांत हे शेतकरी आहेत. सुरुवातीला सानिकाचा कल ॲथलेटिक्सकडे होता, पण नंतर तिने हॉकीची वाट धरली. तिच्यातील गुणवत्ता सर्वप्रथम प्रशिक्षक अनिकेत मोरे यांनी ओळखली आणि त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला तांत्रिक बळकटी आणि आत्मविश्वास मिळाला. मर्यादित सुविधा आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती गावच्या मैदानावरून थेट भारतीय ज्युनियर संघापर्यंत पोहोचली.
या स्पर्धेत सानिकाने भारताच्या आक्रमक फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ४-१ विजयात तिने एक गोल केला, मलेशियाविरुद्धच्या ११-१ अशा एकतर्फी विजयात दोन गोल केले, जपानविरुद्ध एक गोल करत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली आणि पाकिस्तानविरुद्ध दोन गोल झळकावले.
या विजेतेपदामुळे भारताने FIH ज्युनियर महिला विश्वचषकासाठीची पात्रताही निश्चित केली आहे. चीनमध्ये सानिकाने गोल केल्याची बातमी पोहोचताच कोल्हापूरच्या नूल गावात जल्लोष सुरू झाला. शेतकरी कुटुंबातील मुलीने जगाच्या मंचावर भारताचा तिरंगा फडकवल्याने गावकऱ्यांनी पेढे वाटले आणि फटाके फोडले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष, हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष आणि हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी सानिकाच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले, "सानिका मानेने मिळवलेले हे यश अत्यंत मोठे आहे. आशिया कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देणे ही महाराष्ट्राच्या हॉकीसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे."