शेतकरी हाच देशाच्या प्रगतीचा कणा, किसान मोर्चाने गावागावात पोहोचावे - मुनगंटीवार
चंद्रपुरातील जिल्हास्तरीय किसान मोर्चा मेळाव्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन, दोन दिवसांची शेतकरी कार्यशाळा घेण्याची सूचना
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शेतकऱ्याच्या घामातून देशाची भूक भागते आणि त्याच्याच कष्टातून देशाची अर्थव्यवस्था उभी राहते. त्यामुळे शेतकरी हा फक्त शेती करणारा माणूस नाही, तर देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा आणि देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. शेतकऱ्याचे प्रश्न फक्त योजना आणि आकडेवारीच्या चौकटीतून बघून चालणार नाहीत, तर त्याच्या बांधावर जाऊन त्याची व्यथा समजून घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. किसान मोर्चाने गावागावात, शेताच्या बांधापर्यंत आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याचा आवाज बनावे, शेतकऱ्याचा प्रश्न स्वतःचा मानून तो शासनापर्यंत ताकदीने पोहोचवणे आणि त्याला न्याय मिळवून देणे हीच किसान मोर्चाची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय किसान मोर्चा मेळावा झाला. या मेळाव्याला आमदार देवराव भोंगळे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ, संयोजक तथा अग्रीक्रॉस प्रमुख रवी निगुडे, किसान मोर्चाचे महामंत्री संतोष देशमुख, रंगनाथ सोलंकी, विजय पिदुरकर, रवी चहारे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकार, देवानंद महाजन, प्रमोद कडस्कर, अनिल मोरे तसेच जिल्ह्यातील किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किसान मोर्चाची पुढील भूमिका, संघटनबांधणी आणि शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या आणि आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, शेतकऱ्यांवर कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना केली.
'जय जवान, जय किसान' हा फक्त नारा नसून, देशाच्या पालनपोषणाची सर्वात मोठी जबाबदारी असलेल्या शेती व्यवसायाला आणि शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राज्यात 1 कोटी 71 लाख सातबारा धारक असून, शेतीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोट्यवधी लोकांची उपजीविका अवलंबून असल्याचे सांगत, शेती हा फक्त एक व्यवसाय नसून समाजाच्या आर्थिक जीवनाचा कणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मातेची सेवा करणाऱ्याला सुपुत्र आणि मातीची सेवा करणाऱ्याला शेतकरी म्हटले जाते, तर नांगराचा शोध हा माणसाचे आयुष्य बदलणारा शोध होता आणि त्यानंतरच शेती हा पहिला व्यवसाय ठरला, अशी आठवण त्यांनी करून दिली. मात्र आज प्रगतीच्या वाटेवर शेती शेवटचा व्यवसाय बनत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी' या जुन्या म्हणीचा दाखला देत, एकेकाळी शेतीला सर्वोच्च स्थान होते, पण आज परिस्थिती उलटी झाल्याचे ते म्हणाले. शेतकरी कष्ट करतोच, पण त्याची संघटित ताकद वाढवण्याची गरज असून, नशिबाला दोष देत गप्प न बसता शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेतृत्व करायचे असेल तर संघटनबांधणी योग्य पद्धतीने व्हायला हवी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत किसान मोर्चाची संघटना पोहोचायला हवी, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात किती यश आले, याचा विचार व्हायला हवा; योजना पोहोचल्यानंतर शेतकरी खरोखर समाधानी झाला का आणि त्याच्या अडचणी दूर झाल्या का, याचेही मूल्यमापन व्हायला हवे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात होणाऱ्या विलंबाकडेही त्यांनी लक्ष वेधले. योजनांपर्यंत पोहोचण्याच्या वाटेत अनेक टोल लागतात आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात आनंदापेक्षा तिरस्कार जास्त निर्माण होतो; सबसिडीवर ट्रॅक्टर घेतला, पण सबसिडी कित्येक वर्षांनी मिळाली, तर त्या योजनेचा उद्देशच कमकुवत होतो, असे सांगत योजनांचा लाभ सोपा, पारदर्शक आणि वेळेत मिळायला हवा, असे त्यांनी अधोरेखित केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न विधानसभेत मांडला असून धानाच्या बोनससाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतल्याचे सांगत, धानाचा शेतकरी हा गरीब शेतकरी असल्याने त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी, असे मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवणारा कोणी असेल तर तो शेतकरी असून, शेतकऱ्यांची संघटना आणि वैचारिक मंच दोन्ही मजबूत व्हायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक घेण्याची सूचना केली. या बैठकीत दोन दिवसांची शेतकरी कार्यशाळा घेऊन शेतीशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करावी आणि शेती व्यवसाय पुढे नेण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, हा प्रस्ताव शेतकरी, कृषी विभाग आणि कृषी मंत्रालयासाठी दिशादर्शक ठरावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त कागदावर किंवा बैठकीत न समजता गावागावात जाऊन प्रत्यक्ष संवाद साधावा, अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आंदोलनाच्या इतिहासाचा दाखला देत मुनगंटीवार यांनी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली. वयाच्या 36व्या वर्षी लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले होते आणि शेतकऱ्यांना आपला पक्ष आपलासा वाटावा या भावनेतून त्यांच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये भारतीय जनता पार्टीची पहिली संघर्ष किसान यात्रा चंद्रपूरच्या काळाराम मंदिरापासून निघाली होती, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूरच्या भूमीला शेतकरी आंदोलनाची आणि संघटनात्मक संघर्षाची परंपरा असल्याचे नमूद करत, याच भूमीतून आजच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नवी दिशा देणारे काम किसान मोर्चाने उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले. "हम रहे या ना रहे, भारत ये रहना चाहिये" या भावनेने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगत, किसान मोर्चाने संवेदनशीलता, अभ्यास, संघटन आणि प्रत्यक्ष कृती या चार बाबींना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.