किचनच्या सुरीची धार कमी झालीये? या उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
स्वयंपाकघरातील सुरी बोथट झाली असेल तर बाजारात न जाता घरच्या घरी दगड, सिरॅमिक मग आणि होनिंग रॉड वापरून तिला धार लावता येते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
स्वयंपाकघरात चाकू किंवा सुरी सतत लागते. भाजी, फळे आणि इतर पदार्थ कापण्यासाठी हिचा वापर होतो. पण रोजच्या आणि सततच्या वापरामुळे काही काळाने सुरीची धार कमी होत जाते आणि मग भाज्या नीट व पटकन कापल्या जात नाहीत. धार वाढवण्यासाठी अनेकजण बाजारातल्या दुकानात जातात, पण काही सोप्या पद्धतींनी घरच्या घरी सुरीला नव्यासारखी शाईन आणि धारदारपणा देता येतो.
सुरी फारच बोथट झाली असेल तर शार्पनिंग स्टोन म्हणजेच दगडाचा वापर करता येतो. यासाठी आधी दगड पाण्यात भिजवून ठेवावा. मग सुरीची धार त्या दगडाशी साधारण १५ ते २० अंशांच्या कोनात घासत राहावी. ही प्रक्रिया सुरीच्या दोन्ही बाजूंनी करावी लागते, म्हणजे एका बाजूने घासून झालं की सुरी उलटी करून दुसऱ्या बाजूनेही तेच करत राहावं लागतं. यासाठी थोडा वेळ आणि सराव लागतो, पण यामुळे सुरीला नक्कीच धार येते. नवीन करणाऱ्यांनी सुरी स्थिर धरण्यावर आणि घासताना एकाच कोनात घासण्यावर लक्ष द्यावं, कारण कोन सतत बदलत राहिला तर धार सम प्रमाणात येत नाही.
घरात शार्पनिंग स्टोन नसेल तर साध्या सिरॅमिक मगचाही उपयोग होऊ शकतो. मग उलटा करून त्याच्या तळाशी असलेल्या खडबडीत, चकचकीत नसलेल्या भागाकडे बघावं. या भागावर, दगडावर घासतो तशीच सुरी घासून धार वाढवता येते. म्हणजे मगचा तळ हा एका लहान शार्पनिंग स्टोनसारखं काम करतो. मात्र ही पद्धत रोजच्या वापरासाठी नाही, फक्त गरज पडेल तेव्हाच म्हणजे अचानक सुरी बोथट लागली आणि हातात दुसरं साधन नसेल, तेव्हाच वापरावी.
सुरीला धार लावण्यासाठी होनिंग रॉडचाही वापर बरेचदा केला जातो, पण याचं काम थोडं वेगळं असतं. होनिंग रॉड नवीन धार तयार करताना प्रत्यक्षात जास्त धातू काढत नाही, तर सुरीची आधीपासून असलेली धार सरळ करून ती अधिक धारदार बनवतो. म्हणजे सुरी वापरताना तिची धार जी थोडी वाकडी होते, ती होनिंग रॉडमुळे पुन्हा सरळ रेषेत येते. सुरी फार बोथट झाली नसेल आणि थोडी वाकली असेल, तर होनिंग रॉडचा खूप उपयोग होतो. यासाठी सुरीला हलका दबाव देत एकाच सारख्या कोनात दोन्ही बाजूंनी काही वेळ घासत राहावं लागतं.
सुरीची धार जास्त काळ टिकावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. भाज्या कापताना खाली मार्बल दगड किंवा काचेच्या पृष्ठभागाचा वापर करू नये, कारण हे कठीण पृष्ठभाग सुरीची धार लवकर बोथट करतात. त्याऐवजी प्लास्टिक किंवा लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरावा. सुरी इतर भांड्यांसोबत ठेवण्याऐवजी नाईफ ब्लॉक किंवा मॅग्नेटिक स्ट्रिपसारख्या सुरक्षित जागी ठेवावी, जेणेकरून तिची धार इतर भांड्यांना घासून खराब होणार नाही. सुरीला फार वेळ पाण्यात ठेवणंही योग्य नाही, तसंच ती ओली ठेवण्याऐवजी लगेच कापडाने पुसून कोरडी करावी.