KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय, पण विसर्जनानंतरच्या प्रक्रियेबद्दल महापालिकेकडे नोंदच नसल्याचा दावा आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत वर्ष २०२५ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी तब्बल ५ कोटी २६ लाख ३९ हजार ५६३ रुपये खर्च झाल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आलीये. गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती विसर्जनासाठी नदी, तलाव किंवा समुद्रात न जाता कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन करावं, यासाठी दरवर्षी महापालिकेकडून विशेष व्यवस्था उभारली जाते. याच कृत्रिम हौदांसह सिंटेक्स टाक्या, फिरते विसर्जन कक्ष आणि इतर व्यवस्थांसाठी उभारण्यात आलेल्या एकूण १०५ कामांवर हा खर्च झालाय.
हिंदुत्वनिष्ठ आणि दक्ष नागरिक विजय ठाकरे यांनी केडीएमसीकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम हौदांची संख्या, त्यासाठी काढलेल्या निविदा, झालेला खर्च आणि विसर्जनानंतर मूर्तींची विल्हेवाट कशी लावली जाते, याबद्दल तपशीलवार माहिती मागवली होती. यावर मिळालेल्या अधिकृत उत्तरानुसार, महापालिका हद्दीतल्या एकूण १० प्रभागांसाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ९८ निविदा काढण्यात आल्या, तर १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ७ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. अशा प्रकारे लहान-मोठ्या मिळून एकूण १०५ कामांवर वर उल्लेख केलेला खर्च झाल्याचं स्पष्ट झालंय.
दुसरीकडे, विसर्जनानंतर कृत्रिम हौदातल्या पाण्यावर नेमकी काय प्रक्रिया केली जाते आणि विसर्जित गणेशमूर्तींची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने लावली जाते, याबद्दलची कार्यपद्धतीच महापालिकेच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचं माहितीच्या अधिकारातल्या उत्तरातून पुढे आल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. म्हणजेच, कोट्यवधी रुपये खर्च करून दरवर्षी उभारल्या जाणाऱ्या या विसर्जन व्यवस्थेनंतर नेमकी काय प्रक्रिया राबवली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, महापालिका गणेशोत्सवाच्या काळात प्रदूषणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र विसर्जनानंतर प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीचं नेमकं काय केलं जातं, याचीच माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसणं ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेने विसर्जन व्यवस्थेतल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब आणि विसर्जनानंतरच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केलीये.
महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना वर्षभरातल्या सांडपाणी व्यवस्थापनाबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केलीये. शिवाय या संपूर्ण प्रकरणाची प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल चौकशी करावी, अशीही त्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर, माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या खर्चाबद्दल आणि विसर्जनानंतरच्या मूर्ती व पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल केडीएमसी प्रशासनाची नेमकी अधिकृत भूमिका काय, हे स्पष्ट होणं महत्त्वाचं ठरणार आहे.