कात्रज डेअरीची दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ, ११ सप्टेंबरपासून अंमलबजावणी
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हणजेच कात्रज डेअरीने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, तर ग्राहकांचे विक्री दर मात्र जैसे थे राहणार आहेत.
गणेशोत्सव सुरू असतानाच पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने, म्हणजेच कात्रज डेअरीने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी ही माहिती दिली असून ११ सप्टेंबरपासून हे नवे खरेदी दर पुणे जिल्ह्यात लागू होणार आहेत.
पशुखाद्य, वैरण, इंधन आणि वाहतुकीचा खर्च सातत्याने वाढत असल्याचे कारण देत संघाने ही दरवाढ जाहीर केली आहे. नव्या दरानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाला आता प्रतिलिटर ४० रुपये ८० पैसे मिळणार आहेत. तर ६.० फॅट आणि ९.० एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५४ रुपये दर दिला जाणार आहे.
या दरवाढीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊनही याचा भार ग्राहकांवर टाकलेला नाही. दुधाच्या विक्री दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना दुधाचा जास्त मोबदला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना सध्याच्याच दराने दूध मिळत राहील.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असून, दुग्ध व्यवसायाचा उत्पादन खर्चही तितक्याच वेगाने वाढतो आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, या हेतूने संचालक मंडळाने ही दरवाढ मंजूर केली, असे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी सांगितले. पशुखाद्य आणि वैरणीचे भाव वाढल्याने तसेच इंधन आणि वाहतुकीचा खर्चही वाढल्याने दूध उत्पादनाचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर झालेल्या दरवाढीमुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार करत संघाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. उत्पादन खर्च वाढलेला असतानाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी विक्री दर स्थिर ठेवण्याची भूमिका संघाने घेतली आहे.
दूध उत्पादकांनी संघाला स्वच्छ, ताजे आणि भेसळविरहित असे उच्च गुणवत्तेचे दूध पुरवावे, असे आवाहनही अरुण चांभारे यांनी यावेळी केले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्राहकांना दर्जेदार दूध मिळत राहावे, यासोबतच दूध उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेण्यास संघ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.