Police Molestation Case: 'चल येते का...' म्हणत महिलेची छेड; कर्जतमध्ये पोलिस कर्मचाऱ्याविरोधात संताप, नेमका
कर्जत बाजारातून बहिणीसोबत घरी परतणाऱ्या महिलेचा दोन जणांनी पाठलाग करून छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातला एक आरोपी पोलिस कर्मचारी असून तो डीवायएसपींच्या ताफ्यात काम करत असल्याचं सांगितलं जातंय.
कर्जतमध्ये एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात आरोपी असलेला एक जण पोलिस कर्मचारी असल्याचं आणि तो डीवायएसपींच्या ताफ्यात काम करत असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी, म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमाराला तक्रारदार महिला तिच्या बहिणीसोबत कर्जत बाजारातून गुंडगे इथं घरी निघाली होती. दोघी बहिणी चालत घरी जात असताना कर्जत ऑक्ट्रॉय नाक्याजवळच्या रेल्वे पुलावर दोघांनी या दोघी बहिणींचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. यातल्या एकानं महिलेला 'चल येते का चल' असं म्हणत छेड काढल्याचं तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार झाल्यावर महिलेनं लगेच नवऱ्याला फोन करून काय घडलं ते सांगितलं. नवरा हे ऐकून लगेच घटनास्थळी पोहोचला आणि तिथं दोघांची ओळख पटली. यातला प्रमोद मारोती पाटील हा भिसेगावचा राहणारा असून तो पोलिस कर्मचारी असल्याचं समोर आलं. त्याच्यासोबत गुंडगेचा महेंद्र भगवान भंडारे हा दुसरा आरोपी असल्याचं तक्रारीत म्हटलंय.
दरम्यान, महिलेच्या बहिणीनं हा सगळा प्रकार घडत असतानाच मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, असं सांगितलं जातंय. हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पोलिस कर्मचारी असलेल्या आरोपीनं महिलेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली.
घटनेनंतर महिला आणि तिचे कुटुंबीय तक्रार द्यायला कर्जत पोलिस स्टेशनला गेले. पण आरोपी पोलिस कर्मचारी डीवायएसपींच्या ताफ्यात असल्यामुळे सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोलिसांकडूनच अशी टाळाटाळ होत असल्यानं परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये संताप पसरला.
तक्रारीवर लगेच कारवाई व्हावी म्हणून जवळपास वीस ते तीस ग्रामस्थ पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले आणि त्यांनी तिथंच ठाण मांडून गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी लावून धरली. ग्रामस्थांच्या या दबावानंतर अखेर पहाटे साडेतीनच्या सुमाराला गुन्हा दाखल करण्यात आला, असं सांगितलं जातंय.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS २०२३ मधल्या कलम ७५(३), ७८ आणि ७९ अंतर्गत प्रमोद पाटील आणि महेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यावरच महिलेची छेड काढल्याचा आरोप झाल्यानं या घटनेची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि पुढं पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.