यशाच्या मागे धावताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, सतत दबावामुळे वाढतोय ताण
करिअर, नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात सतत यशस्वी होण्याचा दबाव मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो, याबद्दल रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. हमजा हुसेन यांनी माहिती दिली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात यश म्हणजे नेमकं काय, हे बहुतेकदा करिअरमधली प्रगती, पैशांची सुबत्ता, समाजातली इज्जत आणि आयुष्यातल्या ठरावीक टप्प्यांवरून ठरवलं जातं. महत्त्वाकांक्षा असणं चांगलंच असतं, ती माणसाला पुढे जायला आणि स्वतःत सुधारणा करायला भाग पाडते. पण करिअर असो, नातं असो किंवा वैयक्तिक आयुष्य, सतत यशस्वी व्हायचंच अशी टांगती तलवार डोक्यावर राहिली, तर त्याचा हळूहळू मनावर परिणाम व्हायला लागतो. रुबी हॉल क्लिनिकमधल्या सायकियाट्री आणि मेंटल हेल्थ विभागाचे प्रमुख डॉ. हमजा हुसेन यांनी याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
करिअरच्या बाबतीतल्या अपेक्षा हे मोठ्या ताणाचं एक कारण असतं. अपयशाची भीती, नोकरी टिकेल की नाही याची असुरक्षितता, ऑफिसमधली स्पर्धा आणि स्वतःची लायकी वारंवार सिद्ध करत राहावं लागणं, यातून माणूस दीर्घकाळ ताणाखाली राहतो. काही वेळा तर माणूस स्वतःची किंमतच आपल्या कामातल्या यशाशी जोडून टाकतो. मग कामात आलेली एखादी छोटी अडचण किंवा अपयशसुद्धा जणू स्वतःचंच अपयश वाटायला लागतं. हे असंच बराच काळ चाललं, तर त्यातून चिंता, मानसिक थकवा, आत्मविश्वासाचा अभाव आणि भावनिक दमछाक अशा समस्या उद्भवू शकतात.
नात्यांच्या बाबतीतही असाच दबाव जाणवतो. जोडीदार मिळणं, लग्न होणं, नातं 'परफेक्ट' असणं किंवा घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, यासाठी समाजाने आधीच काही ठोकताळे ठरवून ठेवलेले असतात. सोशल मीडियामुळे हा दबाव अजून वाढतो. दुसऱ्यांचं आनंदी नातं, यशस्वी करिअर आणि मस्त आयुष्य दाखवणाऱ्या निवडक पोस्ट बघून आपण नकळत स्वतःची तुलना करायला लागतो. या तुलनेतून न्यूनगंड, एकटेपणा आणि अपेक्षाभंगाची भावना तयार होते.
वैयक्तिक आयुष्यातल्या अपेक्षाही ताण वाढवतात. स्वतःचं दिसणं, तब्येत, पैशाची बाजू, मैत्री आणि जगण्याची पद्धत सांभाळता सांभाळता ऑफिस आणि घर दोन्हीकडची जबाबदारी पेलण्याची धडपड अनेकजण करत असतात. आयुष्यात सगळं काही व्यवस्थित आणि ठरल्याप्रमाणेच व्हायला हवं, हा विचारच चुका, अनिश्चितता किंवा वाईट काळ स्वीकारणं अवघड करून टाकतो.
विश्रांतीला, अपयश मान्य करायला किंवा स्वतःच्या भावना बोलून दाखवायला जेव्हा जागाच उरत नाही, तेव्हा हा दबाव मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. अनेकजण आपल्या भावना दाबून ठेवतात, मदत मागायचं टाळतात आणि मनातून अस्वस्थ असूनही रोजचं आयुष्य रेटत राहतात. हा ताण बराच काळ राहिला, तर झोप, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, नाती आणि तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो. कधीकधी हाच दीर्घकाळचा भावनिक ताण अधिक गंभीर मानसिक आजारांमध्ये बदलू शकतो.
यश ही काही एकच ठरलेली आणि सगळ्यांसाठी सारखी असणारी गोष्ट नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाची परिस्थिती, प्राधान्यक्रम आणि आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. स्वतःसाठी विश्रांतीचा वेळ काढणं, वास्तववादी अपेक्षा ठेवणं आणि जवळच्या, अर्थपूर्ण नात्यांची जपणूक करणं, यातून आयुष्यात जास्त निरोगी समतोल साधता येतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ताण किंवा भावनिक अडचणी असह्य वाटायला लागल्या, तर तज्ज्ञांची मदत घेणं ही काही कमजोरी नाही, तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं ते एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी, निरोगी आणि आनंदी आयुष्य म्हणजे माणसाने किती मिळवलं, हे नसून तो किती सुरक्षितपणे, अर्थपूर्णपणे आणि मानसिक शांततेने जगतो आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.