केस अकाली पांढरे होतायत? भृंगराज तेलाने मुळापासून काळे आणि दाट होतील केस
वयाच्या आधीच केस पांढरे होण्याची समस्या वाढतेय, त्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय म्हणून भृंगराज तेलाचा सोपा फॉर्म्युला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वय वाढायला लागलं की बायकांच्या शरीरात बरेच बदल होतात आणि याचा थेट परिणाम केस आणि त्वचेवर दिसून येतो. पोषक घटकांची कमी, हवामानातले सतत होणारे बदल, हार्मोनल चढउतार अशा वेगवेगळ्या कारणांमुळे केस मोठ्या प्रमाणात गळायला लागतात किंवा पांढरे व्हायला लागतात.
केस एकदा पांढरे झाले की बाजारातले वेगवेगळे हेअर केअर प्रॉडक्ट वापरून, हेअर डाय किंवा कलर करून केस पुन्हा काळे केले जातात. पण काही दिवसातच पुन्हा तेच केस पांढरे व्हायला लागतात आणि केसांची क्वालिटीही खराब होते. सतत केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची क्वालिटी बिघडते आणि केस निस्तेज दिसायला लागतात. यावर उपाय म्हणून पांढरे केस काळे आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पद्धत उपयोगी पडते.
हवामानातले बदल आणि शरीरातल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होत असतील, तर फक्त वरून तेल-मसाज करून भागत नाही, आतून पण शरीराला पोषण मिळणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात बदल करून केसांच्या वाढीसाठी लागणारे पदार्थ खाणं गरजेचं आहे. केस काळे करण्यासाठी कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट न वापरता घरगुती उपायांनी केसांची काळजी घेतलेली बरी.
यासाठी आयुर्वेदिक घटक असलेल्या हिरव्या पानांचा रस कसा वापरायचा, याची एक सोपी पद्धत आहे. भृंगराज ही वनस्पती केसांसाठी वरदान मानली जाते. केसांच्या वाढत्या तक्रारींपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक बायका भृंगराजचा वापर करतात. यामुळे केस मजबूत आणि दाट व्हायला मदत होते. भृंगराजच्या अर्कामुळे केसांच्या मुळाशी असलेल्या पेशी पुन्हा जिवंत होतात आणि नवीन केस उगवायला मदत होते.
घरच्या घरी भृंगराज तेल बनवायचं असेल तर त्यासाठी भृंगराज पावडर, खोबरेल तेल, तिळाचं तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता एवढंच साहित्य लागतं. आधी एका भांड्यात खोबरेल तेल आणि तिळाचं तेल एकत्र करून गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि भृंगराज पावडर टाकायची. हे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित शिजवून झाल्यावर गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यायचं.
त्यानंतर तेल गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं. आठवड्यातून दोन-तीन वेळा, केस धुण्याच्या एक दिवस आधी हे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी केस पाण्याने स्वच्छ धुवायचे. यामुळे पांढरे केस काळे व्हायला मदत होईल आणि खराब झालेली केसांची क्वालिटीही सुधारेल. केस दाट आणि मजबूत करण्यासाठी नेहमी महागडे प्रॉडक्ट वापरायची गरज नाही, त्याऐवजी असे घरगुती उपाय करून केसांची काळजी घेतलेली उत्तम.
टीप - हा लेख फक्त सर्वसाधारण माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.