कॅन्सर रुग्णांच्या हस्ते चंद्रपुरात सूचनापेटीचे उद्घाटन, मुनगंटीवारांचा पुढाकार
पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी सूचनापेटी सुरू, जिवती तालुक्यातील कॅन्सरग्रस्त दाम्पत्याच्या हस्ते फित कापून उद्घाटन.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपुरातल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचं म्हणणं थेट प्रशासनापर्यंत पोहोचावं यासाठी आता एक नवीन सूचनापेटी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचं उद्घाटन जिवती तालुक्यातल्या लांबबोरी गावातल्या रुक्मिणीबाई आकृपी आणि शंकर आकृपी या कॅन्सरग्रस्त दाम्पत्याच्या हस्ते झालं. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना उपचारांबरोबरच विश्वासही मिळावा, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुढाकार घेतला आहे.
कॅन्सरशी लढताना केवळ रुग्णच नाही, तर त्याचं संपूर्ण कुटुंब चिंता आणि प्रश्न घेऊन रुग्णालयात येत असतं. रुग्णाला अत्याधुनिक उपचारांबरोबर आपुलकीचं आणि आधाराचं वातावरण मिळावं, त्याच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन रुग्णालयाच्या सेवेत सतत सुधारणा व्हावी, या हेतूनं मुनगंटीवारांनी ही सूचनापेटी सुरू केली. चंद्रपूरच्या पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये या सूचनापेटीचं उद्घाटन कॅन्सरग्रस्त रुग्णांच्याच हस्ते फित कापून करण्यात आलं, ही बाब समाधानाची असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. रुग्णांच्या सूचना आणि अनुभवातून हे हॉस्पिटल अधिक सक्षम, संवेदनशील आणि रुग्णाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या सूचनापेटीतून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयातल्या सेवा, सुविधा, अडचणी आणि आवश्यक सुधारणांबद्दल थेट सूचना मांडू शकतील, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. या पेटीत फक्त तक्रारी टाकू नयेत, तर रुग्णालय आणखी चांगलं कसं करता येईल, रुग्णांना कोणत्या नव्या सुविधा द्याव्यात आणि उपचाराची प्रोसेस अधिक सोपी कशी करता येईल, याबद्दलही सूचना द्याव्यात, असं त्यांनी नमूद केलं. रुग्णांच्या अनुभवातून मिळणारा फीडबॅक हॉस्पिटलच्या पुढच्या वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरेल, असं ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी मुंबईसारख्या लांबच्या शहरांत जावं लागू नये, यासाठी मुनगंटीवार सातत्यानं प्रयत्न करत होते आणि त्यांनी चंद्रपुरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा आग्रह सरकारकडे धरला होता. 2014 मध्ये अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी या विषयाला प्राधान्य दिलं. खनिज विकास निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीनं उभारलेला हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून, पूर्व विदर्भातल्या कॅन्सर रुग्णांसाठी हे हॉस्पिटल मोठा आधार ठरतंय. हे हॉस्पिटल फक्त अत्याधुनिक सुविधांपुरतं मर्यादित न राहता राज्यातलं एक आदर्श आणि रुग्णाभिमुख कॅन्सर उपचार केंद्र म्हणून नावारूपाला यावं, यासाठी मुनगंटीवारांचे प्रयत्न सुरू आहेत.
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर व्हावा, यासाठीही प्रयत्न होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. जीवनदायी योजनेअंतर्गत ऑपरेशननंतर रुग्णांना मिळणारी आर्थिक मदत उशीर न होता लगेच मिळावी, यासाठी एआय टेक्नॉलॉजी वापरण्याबद्दल आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. लकवा आणि कॅन्सरसारख्या आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना सरकारच्या मदतीचा लाभ वेळेत मिळायला हवा, यावरही त्यांनी भर दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातली प्राथमिक आरोग्य केंद्रं अपडेट करण्यात आली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलचंही लवकरच लोकार्पण होणार आहे. याशिवाय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून बल्लारपूरला एक हॉस्पिटल उभारलं जात आहे. यासाठी जागा मिळाल्यास एआय टेक्नॉलॉजी वापरून रोबोटिक सर्जरीसह उच्च दर्जाच्या उपचार सुविधा असलेलं आधुनिक हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावानं सुरू असलेलं हे हॉस्पिटल समाजातल्या वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा देणारं उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित व्हावं, ही आपली भूमिका असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचारांबरोबर सन्मान आणि आधार मिळावा, यासाठी रुग्णांच्या सूचनांना महत्त्व देणं गरजेचं आहे, त्यामुळे ही सूचनापेटी फक्त तक्रारींचं साधन न राहता रुग्णांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारं प्रभावी माध्यम ठरावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जागेची पाहणीही करण्यात आली. अधिकारी-कर्मचाऱ्यांचं निवासस्थान, धर्मशाळा आणि नर्सिंग स्टाफच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना संबंधितांना मुनगंटीवार यांनी दिल्या.