जय जय स्वामी समर्थ मालिकेत गणेशोत्सवात दरोडेखोर सावळ्याच्या घरी बाप्पा येणार, स्वामींची लीला
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवं भावस्पर्शी वळण येतंय. देव न मानणाऱ्या दरोडेखोर सावळ्याच्या घरी स्वामी समर्थ गणपती बसवण्याचा हट्ट धरतात.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत अक्कलकोटमध्ये गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात कथानकाला एक भावस्पर्शी वळण मिळणार आहे. "उत्सव बाप्पाचा... लीला स्वामींची..." या विचारातून गणपती बाप्पाचं आगमन फक्त एका घरातच नाही, तर एका दरोडेखोराच्या आयुष्यातही नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. मालिका रोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळते.
अक्कलकोटमध्ये दरोडे घालून धुमाकूळ घालणारा तरुण दरोडेखोर सावळ्या आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी सावकार गोवर्धनच्या मुलीचं, इराचं अपहरण करतो. योगायोगानं इरासोबत स्वामी समर्थही सावळ्याच्या ताब्यात सापडतात. पण हे अपहरण स्वामींच्याच इच्छेनं घडलेलं असतं. सावळ्याकडे राहून स्वामी त्याच्या रागावर, द्वेषावर, सूडभावनेवर आणि हिंसक स्वभावावर काम करायला लागतात. याच काळात इराच्या मनात घरच्या गणपतीची ओढ लागून राहिलेली असते.
आई-वडिलांपासून लांब असूनही तिला गणेशोत्सव साजरा करायचा आहे, हे स्वामी ओळखतात. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी सावळ्याच्याच घरात गणपती बसवायचा निर्णय घेतात. पण इथे मोठा प्रश्न उभा राहतो - आयुष्यात कधीच देवासमोर हात न जोडलेला सावळ्या स्वतःच्या घरात गणपती कसा बसवणार?
स्वामी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहतात. यंदा सावळ्याच्या घरात गणपती येणार आणि मूर्ती तो स्वतः घेऊन येणार, असं स्वामी त्याला सांगतात, तेव्हा सावळ्या साफ नकार देतो. "मी दरोडेखोर आहे. माझ्या हातून देवाची पूजा होणार नाही. मी गणपती बसवणार नाही," असं तो ठामपणे सांगतो. स्वामी मात्र मिश्कीलपणे त्याला जणू आव्हानच देतात - आयुष्यभर देवासमोर हात न जोडणं ही काही भूषणाची गोष्ट नाही, आता हात जोडायची वेळ आलीये.
याहून गूढ इशारा देत स्वामी सांगतात, "घरात विघ्नहर्ता येईल तेव्हाच तुझ्या आयुष्यातलं विघ्न दूर होईल." आपलं विघ्न स्वतःच दूर करायचा निर्धार करून सावळ्या स्वामींचं आव्हान स्वीकारायला नकार देतो. पण स्वामीही स्पष्ट बजावतात - "तुझ्या हट्टापेक्षा माझा हट्ट मोठा आहे... या घरात गणपती बसणारच, आणि तूच स्वतःहून बसवणार!"
इथून सुरू होते स्वामींच्या लीलेची अनोखी अनुभूती. एकामागून एक संकेत मिळत सावळ्याला स्वामी वेगळ्याच वाटेवर घेऊन जातात. सावळ्या गणपती घरी आणायला तयार होईल का, हा प्रश्न कायम आहे. एका दरोडेखोराच्या हातून स्वामी गणपतीची स्थापना का करवून घेतायत, आणि बाप्पाच्या आगमनानं सावळ्याच्या आयुष्यात नेमका काय बदल घडणार, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
स्वामी आणि सावळ्यामधली ही फक्त हट्टाची लढाई आहे, की एका दरोडेखोराच्या बदलाची सुरुवात, हे कथानकातून उलगडत जाईल. प्रारब्ध स्वामींशी जोडलेलं असलं, तर दुर्दैवाच्या फेऱ्यातून स्वामी भक्ताला सोडवून सुदैवाशी जोडतात, असं म्हटलं जातं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सावळ्याच्या घरात बाप्पा येणार आहे, आणि त्याच्यासोबत येणार आहे श्रद्धेचा पहिला किरण, चांगल्या विचारांची चाहूल आणि एका कठोर मनाच्या बदलाची सुरुवात.