जपानी लोक आंघोळीसाठी रात्रीचीच वेळ का निवडतात? कारणं जाणून घ्या
जपानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने सोशल मीडियावरून जपानी लोकांच्या रात्रीच्या आंघोळीच्या सवयीमागची कारणं उलगडली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जगातल्या प्रत्येक देशाची म्हणून एक खास संस्कृती आणि राहणीमान असतं. जपानबद्दल बोलायचं झालं तर तिथलं तंत्रज्ञान असो किंवा लोकांची रोजची जगण्याची पद्धत, प्रत्येक गोष्ट आपल्याला थक्क करते. अशीच एक गोष्ट म्हणजे तिथले लोक सकाळी अंघोळ न करता रात्री अंघोळ करतात, आणि याबद्दल सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर चर्चा रंगली आहे.
जपानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने आपल्या व्लॉगमधून याच रहस्यावरचा पडदा उचलला आहे. जपानी लोकांच्या या खास स्नान संस्कृतीला 'ओफुरो' असं म्हटलं जातं, आणि तिने त्यामागची चार मुख्य आणि रंजक कारणं सांगितली आहेत.
पहिलं कारण आहे 'द बाउंड्री इफेक्ट'. जपानी जीवनशैलीत रात्रीची अंघोळ ही फक्त शरीर धुण्यापुरती मर्यादित नसते, तर ती मानसिक शांततेचंही एक साधन असते. अंगावर कोमट पाणी पडलं की दिवसभराचा ताण, ऑफिसमधलं टेन्शन आणि मानसिक थकवा आपोआप निघून जातो. हे कोमट पाणी मेंदूला असा संकेत देतं की आता काम संपलं आहे आणि आराम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच जपानी लोक रात्री अंघोळ करतात.
दुसरं कारण म्हणजे स्वच्छतेबाबत जपानी लोकांना असलेलं एक वेगळंच वेड. ते 'नो आउटसाइड डर्ट' हे धोरण कटाक्षाने पाळतात. दिवसभरातली धूळ, घाण, प्रदूषण आणि घाम अंगावर घेऊन ते कधीच झोपायला जात नाहीत. अस्वच्छ शरीराने झोपलं तर संपूर्ण घर आणि झोपण्याची जागाही खराब होते, असं त्यांना वाटतं. म्हणूनच रात्री अंघोळ करून पूर्ण स्वच्छ झाल्यावरच ते अंथरुणात जातात.
तिसरं कारण वयाशी निगडित आहे. वय वाढत जातं तसं, विशेषतः चाळिशीनंतर, पुरुष आणि बायका दोघांमध्येही अंग आखडणं, पाठदुखी आणि थकवा या गोष्टी सर्रास दिसतात. यावर उपाय काय, हे जपानी लोकांना पक्कं ठाऊक आहे. रात्री गरम पाण्याच्या टबमध्ये, म्हणजेच ओफुरोमध्ये बसल्याने अंगातल्या सगळ्या आखडलेल्या नसा आणि स्नायू पूर्णपणे मोकळे होतात. अंगातला ताठरपणा आणि दुखणं लगेच कमी होतं आणि सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं.
चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे जपानी महिलांच्या नितळ आणि तरुण त्वचेचं गुपित याच रात्रीच्या अंघोळीत दडलेलं आहे. रात्री गरम पाण्याने अंघोळ केल्यावर शरीरात झोप आणणारं मेलाटोनिन हार्मोन तयार होतं. यामुळे शांत आणि गाढ झोप लागते, आणि झोपेत त्वचेच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करून घेतात. त्यामुळेच सकाळी उठल्यावर त्यांची त्वचा ताजीतवानी, तजेलदार आणि तरुण दिसते. हे फायदे तुम्हालाही हवे असतील तर ही पद्धत नक्की करून पाहता येईल.