IND Vs PAK: पाकिस्तानची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, या स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून, ही स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान पंजाबमध्ये होणार आहे.
क्रिकेटनंतर आता हॉकीच्या मैदानावरही भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. नुकत्याच झालेल्या महिला आशिया कप 2026 स्पर्धेत हे दोन्ही संघ खेळण्यासाठी एकमेकांसमोर आले होते. भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार असले की चाहत्यांची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असते. आता मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेत पुन्हा एकदा हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार असून, विशेष म्हणजे हा सामना भारतीय भूमीवरच खेळवला जाणार आहे.
27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पंजाबमध्ये ही आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हॉकी इंडियाच्या उपस्थितीत या स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. पंजाबमधील दोन प्रमुख शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने होणार आहेत. भारतात आयोजित होणाऱ्या या आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
घरच्या मैदानावर आणि स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानला हॉकीतही पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. घरच्या मैदानावर आणि स्थानिक चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे भारतीय संघाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळणार आहे, आणि याच जोरावर पाकिस्तानला हॉकीच्या मैदानातही पराभूत करण्याचा भारतीय संघाचा उद्देश आहे.
मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 च्या आयोजनासाठी पंजाब पूर्णपणे तयार झाले आहे. स्पर्धेचे सर्व सामने जालंधर आणि मोहाली या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हॉकी इंडिया आणि पंजाब सरकारने स्पर्धेच्या टप्प्यांचे आणि मैदानांचे नियोजन अधिकृतपणे जाहीर केले आहे.
जालंधरमधील ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवरून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर नॉकआउट टप्प्यातील अंतिम सामना मोहालीच्या ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी जालंधरच्या ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सहभागी सहा संघांचे साखळी सामने जालंधरच्या मैदानावरच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान या सहा संघांचा सहभाग असणार आहे. नॉकआउट टप्प्यातील सामने मोहालीच्या मैदानावर होतील, आणि याच ठिकाणी स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे.