Hyundai चा नवा धमाका! धुमाकूळ घालायला येतेय नवी SUV Bayon; लूक-डिझाइनचे पहिले स्केचेस रिलीज
ह्युंडाईने आपल्या आगामी बेयॉन SUV च्या डिझाइनचे पहिले अधिकृत स्केचेस जाहीर केले असून यातून बाहेरील आणि आतील रचनेची पहिली झलक समोर आली आहे.
भारतातील आघाडीची कार कंपनी ह्युंडाईने आपल्या आगामी 'बेयॉन' (Bayon) या इंटेलिजंट SUV च्या डिझाइनचे पहिले अधिकृत स्केचेस जाहीर केले आहेत. या कारच्या नावाची घोषणा कंपनीने आधीच केली होती, आणि आता या स्केचेसमधून बाहेरील तसंच आतील डिझाइनची पहिली झलक समोर आली आहे. यामुळे कारप्रेमींमध्ये या SUV बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
समोर आलेल्या स्केचमध्ये कारला सरळ, दणकट आणि आकर्षक असा SUV लूक देण्यात आल्याचं दिसतं. गाडीच्या पुढच्या बाजूला एम्बॉस केलेलं बोनेट आणि बाहेरच्या बाजूला फुगवलेले फेंडर्स आहेत, ज्यामुळे कारला समोरून एक ब्रॉड आणि रुंद असा लूक मिळतो. या कारमध्ये ह्युंडाईची सिग्नेचर 'H-Edge' लाईटिंग सिस्टीम देण्यात आली असून हीच फ्रंट डिझाइनचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. खालच्या बाजूला चंकी एलिमेंट्स जोडल्यामुळे कारची SUV इमेज अजून ठळक होते.
हे संपूर्ण डिझाइन ह्युंडाईच्या 'Art of Steel' या विकसित होत असलेल्या डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारलेलं आहे. या तत्त्वज्ञानानुसार गोल आणि वळणदार आकारांऐवजी शार्प लाईन्स आणि स्पष्टपणे परिभाषित केलेल्या सरफेसेसचा वापर करण्यात येतो, आणि तोच दृष्टिकोन बेयॉनच्या या डिझाइनमध्ये दिसून येतो.
स्केचमध्ये केबिनचीही पहिली झलक पाहायला मिळते. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि सोपं युझर इंटरअॅक्शन यावर मुख्य भर देण्यात आला आहे. कंपनीच्या मते, हे केबिन शहरी वापरासाठी इन्ट्युटिव्ह कंट्रोल्स आणि कनेक्टेड एक्सपिरिअन्सचं उत्तम मिश्रण असणार आहे. मात्र हे स्केच फक्त केबिनची थीम दाखवतं; इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिस्प्ले साईझ किंवा अंतिम फीचर्सची यादी कंपनीने अजून जाहीर केलेली नाही, त्यामुळे केबिनमध्ये नेमकं काय काय असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
ह्युंडाईच्या मते, बेयॉन ही मुख्यतः शहरातल्या ड्रायव्हिंगचा विचार करून बनवलेली 'ग्लोबल इंटेलिजंट SUV' आहे. शहरातल्या ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येईल अशा आकारात SUV चा रुबाब देणं हा या गाडीमागचा मुख्य उद्देश असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. म्हणजेच शहरातल्या अरुंद रस्त्यांवर आणि गर्दीच्या ट्रॅफिकमध्येही ही गाडी सहज चालवता यावी, पण त्याचवेळी SUV असल्याचा रुबाबही कायम राहावा, असा या डिझाइनमागचा विचार आहे.
सध्या फक्त डिझाइन स्केचेस जाहीर झाले असून इंजिनची क्षमता, डायमेन्शन्स, संपूर्ण फीचर्स आणि किंमत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. या बहुप्रतिक्षित कारचं लाँचिंग पुढच्या महिन्यात होणं अपेक्षित असून उर्वरित तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत.