अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर एक अनोखा डान्स व्हिडिओ चर्चेत असून, त्यात एक रोबोट पारंपरिक अंदाजात नृत्य सादर करताना दिसतो आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट डान्स व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओत एक रोबोट पारंपरिक अंदाजात नृत्य सादर करताना दिसतो आणि हे बघून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. व्हिडिओ बघितल्यावर कमेंट्सचा अगदी पाऊस पडला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
टेक्नॉलॉजी आता इतकी पुढे गेली आहे की, माणसासारखे दिसणारे रोबोट्स फक्त चालणं-फिरणं इतकंच करत नाहीत, तर आता ते माणसांसारखा डान्सही करू लागले आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे हा व्हायरल झालेला व्हिडिओ, ज्यात एक रोबोट बॉलीवूडच्या गाण्यावर चक्क शास्त्रीय नृत्य करताना दिसतो. व्हिडिओत बॅकग्राऊंडला 'मला जाऊ दे' हे लोकप्रिय गाणं वाजतंय आणि त्यावर हा ह्युमनॉईड रोबोट आपलं नृत्य सादर करतोय. हे नृत्य बसवण्यासाठी रोबोटला खास ट्रेनिंग देण्यात आलं होतं, आणि व्हिडिओत तो क्लासिकल डान्स करताना दिसतो. रोबोटला हे नृत्य शिकवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं दर्शनही या व्हिडिओतून घडतं.
हा व्हिडिओ @zikiguy आणि @mayatherobot या दोन इंस्टाग्राम अकाउंट्सवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत क्रिएटर्सनी रोबोटला क्लासिकल डान्सचं ट्रेनिंग नेमकं कसं दिलं गेलं, हेही दाखवलं आहे. रोबोटच्या गळ्यात चोकर नेकलेस, पायात बूट आणि अंगावर चोळी-घागरा असा पारंपरिक पेहराव घातलेला आहे. डोक्यावर मऊ केसांचा विग चढवून याच साजात रोबोट शास्त्रीय नृत्य सादर करतो. रोबोट इतक्या सफाईने पारंपरिक डान्स करताना बघून यूजर्स चांगलेच चकित झाले असून व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या रोबोटचं नाव माया असल्याचं समोर आलं आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे जगातील पहिलं ह्युमनॉईड रोबोटने सादर केलेलं भारतीय शास्त्रीय नृत्य आहे. मात्र या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा प्रोजेक्ट मास्टर्स युनियन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आला आहे. म्हणजेच हा रोबोट एखाद्या कंपनीने नाही, तर विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केला आहे, ही बाब या व्हिडिओला आणखी खास बनवते.
या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले असून कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली, "रोबोट चित्रपट आता प्रत्यक्षात उतरत आहे, खरंय." दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, "मला समजत नाहीये, त्याने तो रोबोट विकत घेतला की बनवला?" तर आणखी एका यूजरने मिश्किलपणे विचारलं, "भावा आता तू डान्सर्सच्या नोकऱ्या सुद्धा खाणार का?" अशा प्रकारे या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि विनोदाचा मिलाफ घडवला आहे.