'अंतर ठेवा' म्हणताच संतापला; पाठलाग, वाद अन् अचानक धडक, महिला बाईकरसोबत धक्कादायक प्रकार
गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर एका महिला बाईकरला कारने जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना बाईकरच्याच कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. धडक दिल्यानंतर कारचालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'rebelwheels_sia_' या नावाने सोशल मीडियावर पेज चालवणारी सिया नावाची महिला रायडर त्या दिवशी तिच्या रायडिंग ग्रुपसोबत जात होती. तिच्याकडे Aprilia RS 457 ही स्पोर्ट्स बाईक होती. सियाने दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधले काही तरुण सुरुवातीपासूनच तिचा पाठलाग करत होते. ती कार खूपच आक्रमकपणे चालवली जात असल्यामुळे तिने कारचालकाला तिच्या बाईकपासून अंतर ठेवायला सांगितले.
अंतर ठेवण्याची विनंती केल्यावर कारमधल्या तरुणांनी उलट तिला बाईक थांबवण्यास सांगून धमकावले, असे सियाने सांगितले. कारमधले तरुण नशेत असावेत असा संशयही तिने व्यक्त केला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर सिया आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राने कारला पुढे जाण्यापासून रोखण्याचा आणि तिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान कारचालकाने अचानक बाईकला कट मारला आणि सियाच्या Aprilia RS 457 बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की सिया रस्त्यावर फेकली गेली आणि तिची बाईक काही मीटरपर्यंत फरफटत गेली. हे सगळे तिच्या बाईकवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.
अपघातानंतर थांबून मदत करण्याऐवजी कारचालक तिथेच न थांबता पळून गेला, असा आरोप आहे. पुढे रस्त्यावरच्या एका ट्रॅफिक सिग्नलवर सियाच्या एका मित्राने त्या कारचालकाला गाठून त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने आपली चूक मान्य केली नाही आणि तिथून निघून गेला, असे सियाने सांगितले.
या घटनेनंतर सियाने अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सोबतच त्या कारचा नंबर आणि गाडीच्या मालकाचे नावही तिने उघड केले आणि गुरुग्राम पोलिसांकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. दिल्ली-हरियाणा पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत संबंधित कारचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जाते आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृतपणे नेमकी काय कारवाई आणि तपास होतो, याची माहिती अद्याप समोर यायची आहे.