गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:20 IST

पहिल्यांदा गौरी बसवणार आहात? जाणून घ्या आणण्यापासून विसर्जनापर्यंतची संपूर्ण पद्धत

गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पहिल्यांदाच घरी गौरी बसवणार असाल तर टेन्शन घेण्याआधी ही सोपी माहिती वाचा.

पहिल्यांदा गौरी बसवणार आहात? जाणून घ्या आणण्यापासून विसर्जनापर्यंतची संपूर्ण पद्धत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

बाप्पा घरी आला की दोन-तीन दिवसांतच गौरींचंही आगमन होतं. महाराष्ट्रात हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गौरीला केवळ देवी म्हणून नाही, तर माहेरवाशीण लेक म्हणून वागवलं जातं. लेक माहेरी आली की जसं तिचं स्वागत केलं जातं, तसंच गौरीचंही केलं जातं. काही घरात गौरी म्हणजे पार्वती, तर काही घरात महालक्ष्मी मानली जाते. गौरी आली की घरात सुख, पैसा आणि सौभाग्य येतं अशी श्रद्धा आहे. पण घरी पहिल्यांदाच गौरी बसवायची असेल तर काय करायचं, कुठून आणायच्या, कशी तयारी करायची, याबद्दल मनात प्रश्न असतात.

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की गौरी बसवण्याचा एकच ठराविक नियम नाही. प्रत्येक घराची स्वतःची पद्धत असते. त्यामुळे दुसऱ्याच्या घरी काय होतं ते बघून तसंच करायला जाऊ नका. आई, आजी कशा गौरी बसवायच्या, कोणता नैवेद्य करायच्या, हे आधी घरातल्या मोठ्या माणसांना किंवा गुरुजींना विचारून घ्या. तुमचा घरचा कुलाचार हाच खरा नियम आहे.

गौरी कुठून आणायच्या याबाबतही ठराविक नियम नाही. अनेक घरात पहिली गौरी माहेरहून आणली जाते, तर काही ठिकाणी जवळच्या नातेवाईकांकडून किंवा सासरच्या पद्धतीने आणली जाते. घरात आधीपासून जी पद्धत चालत आलेली असेल तीच पुढे सुरू ठेवावी. नवीन घर असेल तर घरातल्या मोठ्या माणसांना विचारून ठरवावं.

गौरी घरी येणं म्हणजे साक्षात लक्ष्मी घरी येणं असं मानलं जातं, त्यामुळे आधी घर स्वच्छ करावं, दारात रांगोळी काढावी आणि तोरण लावावं. गौरी आनंदाने घरी आणाव्यात. अनेक घरात दारापासून देवघरापर्यंत गौरीची छोटी पावलं काढली जातात, कारण गौरी उंबरठा ओलांडून घरात सुख घेऊन येते अशी समजूत आहे. काही घरात गौरीला संपूर्ण घर, विशेषतः स्वयंपाकघर दाखवलं जातं. आपली लेक आली आहे, तिला घर दाखवायचं, या भावनेतून ही परंपरा पाळली जाते.

गौरीच्या सजावटीसाठी नवी साडी, दागिने, हार, गजरा, फुलं लागतात. कुंकू, हळद, अत्तर हेदेखील आधीच तयार ठेवावं. गौरी ही सौभाग्याचं रूप मानली जात असल्याने बांगड्या आणि कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं. कोणती साडी नेसवायची हेही घराच्या पद्धतीनुसार ठरतं.

ज्यांच्याकडून गौरी आणली जाते त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत, त्यांना वाण दिलं जातं. वाणात ब्लाऊज पीस, नारळ, फळं किंवा सौभाग्याच्या वस्तू दिल्या जाऊ शकतात. हेही घराप्रमाणे वेगळं असतं.

अनेक घरात दोन गौरी बसवल्या जातात, ज्येष्ठा आणि कनिष्ठा, म्हणजे दोन बहिणी मानून त्यांची स्वतंत्र पूजा केली जाते. मात्र काही घरात एकच गौरी बसवली जाते. त्यामुळे दोन आणायच्या की एक, हेही घरात विचारून ठरवावं.

गौरींचा कार्यक्रम साधारण तीन दिवसांचा असतो. पहिला दिवस आगमनाचा, या दिवशी गौरीला घरी आणून बसवलं जातं आणि साधा नैवेद्य दाखवला जातो. दुसरा दिवस मुख्य पूजेचा असतो, या दिवशी मोठी पूजा होते आणि पुरणपोळी, सोळा भाज्या, भात, वडे असा मोठा नैवेद्य केला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जन करून गौरीला परत पाठवलं जातं.

पहिल्यांदा गौरी बसवताना अनेक जण वेगवेगळं सांगतात, असं केलं नाही तर दोष लागेल असंही म्हटलं जातं. मात्र प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची गरज नाही. आपल्या घरची परंपरा हाच खरा नियम असतो. श्रद्धेने आणि प्रेमाने गौरीला घरी आणून तिची सेवा केली तर पुरेसं असतं. काही शंका असल्यास गुरुजींना एकदा विचारून घेतल्यास मनातली भीती दूर होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ