'तुम्बाड'च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
सोहम शाह यांच्या 'तुम्बाड' चित्रपटाच्या थीमवर यंदाच्या गणेशोत्सवात मंडप साकारले गेले असून, चाहत्यांनी सिनेमातील भयावह जग सजावटीतून उभं केलं आहे.
सोहम शाह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'तुम्बाड' या चित्रपटाने प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वेगळी कथा, भयावह वातावरणनिर्मिती, जबरदस्त अभिनय आणि देखणे व्हिज्युअल्स यामुळे या सिनेमाने देशात आणि परदेशातही मोठा चाहतावर्ग जमवला. त्यामुळे 'तुम्बाड' हा नुसता एक चित्रपट राहिला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक कल्ट फ्रँचायझी बनला. या सिनेमाची क्रेझ आजही टिकून असल्याचं यंदाच्या गणेशोत्सवात दिसून आलं.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशभरातील अनेक ठिकाणी 'तुम्बाड'च्या थीमवर आधारित गणपती मंडप साकारले गेले आहेत. या मंडपांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, चाहत्यांनी आपल्या कल्पकतेतून सिनेमातील भयावह जग गणेशोत्सवाच्या सजावटीत उतरवल्याचं पाहायला मिळतं आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे 'तुम्बाड'ची थीम मंडपांमधून साकारली गेल्यामुळे या सजावटींची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
या मंडपांमध्ये सिनेमातल्या प्रसिद्ध हस्तर या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेतलेली सजावट दिसते. लाल रंगाच्या भयावह भिंती, मंडपाच्या प्रवेशद्वारावर हातात भांड्यासारखी वस्तू घेतलेली देवीची मूर्ती आणि गणेशमूर्तीच्या मागे उभं केलेलं भीतीदायक वातावरण लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी तर 'तुम्बाड'च्या जगाची आठवण करून देणारे भयावह कॉरिडॉर आणि सिनेमातल्या सेटसारख्या रचना उभारण्यात आल्या आहेत. या सगळ्या सजावटींमधून चाहत्यांनी सिनेमातलं वातावरण अगदी हुबेहूब उभं करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.
2018 साली प्रदर्शित झालेल्या 'तुम्बाड'ने आपल्या लोककथांवर आधारित कथानकामुळे आणि वेगळ्या मांडणीमुळे हळूहळू मोठा चाहतावर्ग तयार केला. विशेष म्हणजे 2024 मध्ये हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला आधीपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळाला. री-रिलीजनंतर 'तुम्बाड'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत पहिल्या प्रदर्शनापेक्षाही जास्त प्रेक्षक आपल्याकडे खेचले. या यशामुळे हा सिनेमा फक्त जुन्या चाहत्यांपुरता मर्यादित नसून नव्या पिढीतही त्याची क्रेझ कायम असल्याचं स्पष्ट झालं. एका जुन्या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित होऊनही अशी कामगिरी करणं ही या फ्रँचायझीसाठी मोठी गोष्ट मानली जाते.
दरम्यान, 'तुम्बाड'च्या आगामी सिक्वेलचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. 'तुम्बाड 2'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री झाल्यानंतर या सिनेमाची चर्चा आणखी वाढली होती. आता यात अभिनेत्री आलिया भट्ट देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी जुलैमध्ये या महत्त्वाच्या कास्टिंगची घोषणा केली होती. त्यामुळे सोहम शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया भट्ट हे तिघेही कलाकार या बहुप्रतीक्षित फ्रँचायझीच्या पुढच्या भागात एकत्र दिसणार आहेत.
'तुम्बाड'च्या थीमवर गणपती मंडप साकारण्यापासून ते 'तुम्बाड 2'बद्दलची वाढती उत्सुकता, यावरून या फ्रँचायझीचा चाहतावर्ग किती मोठा आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.