गणेशोत्सवात घरच्या घरी करा मार्केटसारखी खुसखुशीत बालुशाही, सोपी रेसिपी
सणासुदीला गोड पदार्थ हवा असेल तर मिठाईच्या दुकानातून आणण्यापेक्षा घरीच बालुशाही बनवा, तीही अगदी सोप्या पद्धतीने.
बालुशाही ही मिठाई आपण नेहमी दुकानातून विकत घेऊन खातो. पण मोजक्याच साहित्यापासून ही मिठाई घरीसुद्धा तयार करता येते हे फार जणांना माहीत नसतं. सणासुदीच्या दिवसांत किंवा घरी खास पाहुणे येणार असतील, तर बालुशाही हा एक भारी पर्याय ठरतो. बाहेरून जरा कुरकुरीत आणि आतून मऊसर असा तिचा पोत असतो, आणि नीट पद्धतीने बनवली तर चव अगदी दुकानातल्यासारखीच लागते.
ही मिठाई बनवायला मैदा, तूप, दही आणि साखर अशा घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींचा वापर होतो. बालुशाहीची खासियत म्हणजे ती थेट गरम तेलात न तळता मध्यम आचेवर सावकाश तळली जाते, त्यामुळे तिचा पोत मस्त तयार होतो. तळून झाल्यावर ती साखरेच्या पाकात बुडवली जाते, त्यामुळे आतपर्यंत गोडवा मुरतो आणि वरून साखरेचा हलका थरही चढतो. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव किंवा पाहुण्यांसाठी खास गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करता येईल.
यासाठी लागणारं साहित्य म्हणजे दोन कप मैदा, पाच टेबलस्पून तूप, तीन टेबलस्पून दही, एक चिमूट बेकिंग सोडा, गरजेनुसार पाणी आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप. पाकासाठी दीड कप साखर, पाऊण कप पाणी, अर्धा टीस्पून वेलची पूड आणि अर्धा टीस्पून लिंबाचा रस लागतो.
बनवण्याची पद्धत अशी - एका परातीत मैदा घेऊन त्यात तूप आणि बेकिंग सोडा घालून हाताने चांगलं चोळून घ्या. मग दही घालून मिश्रण एकत्र करा आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवा. पीठ जास्त मळू नका, ते मऊसर आणि किंचित सैलच राहू द्या. भिजवलेलं पीठ काही मिनिटं झाकून ठेवा, मग त्याचे सारखे गोळे करून प्रत्येक गोळा हलका दाबून मध्ये छोटासा खळगा करा. आकार फार पातळ करू नये.
कढईत तेल किंवा तूप गरम करा, पण तेल खूपच तापल्यावर लगेच बालुशाही टाकू नका. मध्यम ते मंद आचेवर सावकाश तळा, आतपर्यंत नीट शिजू द्या आणि रंग हलका सोनेरी झाला की बाहेर काढा. दुसरीकडे साखर आणि पाणी उकळत ठेवून पाक जरा घट्टसर होऊ द्या, त्यात वेलची पूड आणि लिंबाचा रस घाला. पाक फार घट्ट करू नका.
तळलेली बालुशाही थोडी कोमट असतानाच पाकात टाका आणि काही मिनिटं तशीच राहू द्या, म्हणजे गोडवा आतपर्यंत मुरेल. मग पाकातून काढून ताटात किंवा जाळीवर ठेवा. थंड झाल्यावर वर साखरेचा हलका थर तयार होतो, त्यामुळे बालुशाही दिसायलाही छान दिसते आणि चवही खास लागते. पूर्ण थंड झाल्यावर सर्व्ह करा, वरून बारीक चिरलेले बदाम किंवा पिस्ते घालून सजवू शकता. हवाबंद डब्यात ठेवली तर काही दिवस चांगली राहते.
बालुशाही मऊ आणि खुसखुशीत व्हावी म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा - पीठ जास्त मळलं तर बालुशाही कडक होते, तळताना तेल खूप गरम ठेवू नका, मंद आचेवर सावकाश तळल्यानेच ती आतून नीट शिजते आणि पाक जास्त घट्ट केला तर वरचा साखरेचा थर जाडसर होऊ शकतो. पाकात टाकण्यापूर्वी बालुशाही थोडी कोमट असणं गरजेचं आहे.