गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी अवघ्या पंधरा मिनिटांत करा शेवयाची खीर
गणेशोत्सवात नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकांना वेळ नसेल तर शेवयाच्या खिरीचा झटपट पर्याय उपयोगी पडतो.
गणपती बाप्पा घरी आला की काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवायचा उत्साह प्रत्येकाच्या घरात असतो. अनेक घरांमध्ये पहिल्या दिवशी उकडीचे मोदक केले जातात तर काही ठिकाणी खीर बनवली जाते. पण उकडीचे मोदक करायचे म्हटलं की पीठ मळणं, सारण तयार करणं आणि मोदक वळणं यात अख्खा दिवस निघून जातो. ऑफिसवरून आल्यावर एवढा वेळ आणि मेहनत देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अशा वेळी शेवयाची खीर हा सगळ्यात सोपा आणि झटपट पर्याय ठरतो. ही खीर अवघ्या पाच ते दहा मिनिटांत तयार होते आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवायलाही चालते.
खीर करण्यासाठी लागणारं साहित्य अगदी घरात सहज मिळणारं आहे. बारीक भाजलेल्या शेवया एक वाटी, दूध अर्धा ते एक लिटर, साखर दीड ते दोन वाटी म्हणजे तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार, साजूक तूप दोन चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, काजू-बदाम-पिस्ता-मनुके-चारोळी थोडे थोडे आणि केशर इसेन्स असल्यास दोन ते तीन थेंब एवढं साहित्य पुरेसं आहे.
खीर बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावं. दूध गरम होतानाच त्यात साखर टाकावी, म्हणजे साखर दुधात छान विरघळते आणि गोडवा चांगला उतरतो. दुधाला एक उकळी येऊ द्यावी. दूध उकळत असतानाच दुसरीकडे एका कढईत दोन चमचे तूप गरम करून घ्यावं. तूप तापलं की त्यात एक वाटी बारीक शेवया टाकाव्यात. शेवया आधीच भाजलेल्या असल्या तरी त्या तुपावर पुन्हा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्याव्यात, यामुळे खिरीला खमंग वास येतो.
शेवया परतून झाल्यावर बाजूला काढून ठेवाव्यात आणि त्याच तुपात काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि चारोळी थोडं परतून घ्यावं. मनुके तुपात परतले की ते फुगतात आणि चवीला छान लागतात. त्यानंतर जे दूध उकळत आहे त्यात तुपावर परतलेल्या शेवया आणि सगळा सुका मेवा टाकावा. गॅस बारीक ठेवून हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं उकळू द्यावं, म्हणजे शेवया दुधात मऊ होतील आणि दूध थोडं घट्ट होईल. शेवटी त्यात वेलची पूड आणि केशर इसेन्सचे दोन थेंब टाकले की खीर तयार होते.
ही खीर गरम असतानाही खाता येते आणि फ्रीजमध्ये थंड करूनही खाता येते, दोन्ही प्रकारे ती चविष्ट लागते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. उकडीच्या मोदकाच्या तयारीच्या टेन्शनपेक्षा ही झटपट खीर एकदा करून बघावी, घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल.