आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रणती नायकची निवड, एकमेव भारतीय जिम्नॅस्ट ठरणार
भुवनेश्वरच्या ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करणारी ऑलिम्पिअन प्रणती नायक हिची जपानमधील आयची-नागोया इथे होणाऱ्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळात होणार असून प्रणती या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली प्रणती ही एकमेव भारतीय जिम्नॅस्ट आहे. ती आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील महिलांच्या व्हॉल्ट आणि महिलांच्या ऑल-अराउंड या दोन्ही प्रकारांत भाग घेणार आहे. तिच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची ही निवड झाली, यात उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये झालेल्या एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कप 2026 मध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात तिनं जिंकलेल्या रौप्यपदकाचाही समावेश आहे.
एएम/एनएस इंडियाचे संचालक आणि एचआर व प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष तेलंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताची एकमेव जिम्नॅस्ट म्हणून प्रणतीची झालेली निवड ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि यातून तिचं सातत्य, शिस्त आणि दृढनिश्चय दिसून येतं. ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण आणि मदत दिली जाते, यावरच आमचा भर असतो, असं ते म्हणाले. आयची-नागोया इथे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी प्रणतीला शुभेच्छाही दिल्या.
प्रणतीनं यापूर्वी टोकियो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. 2026 मध्ये तिनं ताश्कंदमधील एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये रौप्यपदक तर 54 व्या ऑल इंडिया रेल्वे जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. यासोबतच तिनं ग्लासगोमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
2025 मध्ये तिनं एशियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप आणि एफआयजी अॅपॅरेटस वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तसंच 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिनं एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक असे तीन पदकं मिळवली. गेल्या काही वर्षांत तिनं अनेक राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय एफआयजी स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत.
भुवनेश्वरचं ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर खेळाडूंना विशेष कोचिंग, दर्जेदार प्रशिक्षण सुविधा आणि सर्वंकष मदत पुरवून उच्च दर्जाच्या जिम्नॅस्टना घडवण्याचं काम करतं. भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे स्पर्धा करता यावी, हाच या सेंटरचा मुख्य उद्देश आहे.