Steve Smith मोठा निर्णय घेणार? Ashes सिरीज खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणाला...
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने 2027 च्या अॅशेस मालिकेबद्दल अजून काहीच ठरवलेले नाही असे सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने 2027 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत खेळण्याबाबत अजून काहीच ठरवलेले नाही, असे सांगितले आहे. सध्या 37 वर्षांचा असलेला स्मिथ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे आणि आता तो लांबचा विचार न करता एका वेळी एकाच मालिकेकडे बघतो आहे. ऑस्ट्रेलियासाठी अॅशेस मालिका नेहमीच खूप महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळेच स्मिथच्या या भूमिकेकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
सध्या युरोपियन T20 प्रीमियम लीगमध्ये ॲमस्टरडॅम फ्लेम्स या संघाकडून खेळणाऱ्या स्मिथने आपल्या पुढच्या प्लॅनबद्दल मोकळेपणाने बोलणे केले. कसोटी क्रिकेटमधल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याबद्दल मात्र त्याने उत्साह दाखवला. 2028 मध्ये लॉस एंजिल्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असून, या ऐतिहासिक ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळणे हे आपले मुख्य लक्ष्य असल्याचे स्मिथने स्पष्ट केले. म्हणजेच पुढच्या काही वर्षांतल्या आपल्या कारकिर्दीचा प्राधान्यक्रम स्मिथच्या डोक्यात स्पष्ट असल्याचे यातून दिसते.
2027 च्या अॅशेसमध्ये खेळणार का, या प्रश्नाला उत्तर देताना स्मिथ म्हणाला, "मी सध्या 2027 च्या एशेज मालिकेबद्दल कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. माझे वय 37 वर्षे आहे आणि आता मी एका वेळी एकाच मालिकेचा विचार करत पुढे जातो आहे. माझे शरीर आणि फॉर्म कशी साथ देतात, यावरच पुढचे निर्णय अवलंबून असतील." स्मिथच्या या उत्तरातून त्याने अॅशेसमधल्या सहभागाबद्दल कोणतेही ठाम आश्वासन दिलेले नाही, हे स्पष्ट होते.
ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा मुख्य आधार मानल्या जाणाऱ्या स्मिथने कसोटी कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. त्याने आतापर्यंत 125 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 37 कसोटी शतके आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष कसोटी क्रमवारीत तो इंग्लंडच्या हॅरी ब्रूकनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतक्या मोठ्या आणि यशस्वी कारकिर्दीनंतरही स्मिथ आपल्या भविष्याबाबत सावध पावले टाकत असल्याचे दिसते.
ऑस्ट्रेलियन संघ या ऑक्टोबर महिन्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. स्मिथसाठी हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. बॉल टेंपरिंग प्रकरणानंतर स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करत अनेक विक्रम रचले होते. पण ज्या देशात त्याच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा वाद झाला होता, त्याच दक्षिण आफ्रिकेत जाऊन खेळणे हे स्मिथसाठी मोठे आव्हान असणार आहे. ऑक्टोबरमधल्या या मालिकेत स्मिथची कामगिरी कशी राहते, याकडे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यातली कामगिरीच पुढे स्मिथच्या अॅशेसमधल्या सहभागाबद्दलचे संकेत देऊ शकते.