ॲपलचा वार्षिक इव्हेंट आज, फोल्डेबल आयफोनसह नव्या डिव्हाईसची घोषणा अपेक्षित
आयफोन 18 प्रो, पहिला फोल्डेबल आयफोन आणि इतर गॅझेट्सच्या लाँचकडे टेकविश्वाचे लक्ष
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एप्पल कंपनीच्या वार्षिक सप्टेंबर हार्डवेअर इव्हेंटची आज सगळीकडे चर्चा आहे. 9 सप्टेंबरला होणाऱ्या या इव्हेंटबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे लीक्स समोर येत होते आणि आता प्रत्यक्ष लाँचची वेळ जवळ आली आहे. सरप्राईज अँड शाईन या टॅगलाईनखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या इव्हेंटमध्ये कंपनी आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सादर करेल असा अंदाज आहे. यावेळी बेस व्हेरिअंट लाँच होणार नाही, फक्त प्रो मॉडेल्सच येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही मॉडेल्सचे डिझाईन आयफोन 17 प्रो सिरीजसारखेच राहू शकते. आयफोन 18 प्रोला 6.3 इंचाचा तर प्रो मॅक्सला 6.9 इंचाचा डिस्प्ले मिळेल असे सांगितले जात आहे. लीक्सनुसार डायनॅमिक आइलँड आधीपेक्षा थोडा लहान होऊ शकतो आणि प्रो मॉडेल्समध्ये अपग्रेडेड एलटीपीओ+ डिस्प्ले येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोनमध्ये TSMC च्या 2nm प्रोसेसवर बनलेली ॲपलची A20 चिप बसवली जाईल, ज्यामुळे परफॉर्मन्स आणि एफिशिएंसी सुधारेल असे सांगितले जात आहे. लाइट ब्लू, डार्क ग्रे आणि सिल्वरसोबतच डीप रेड किंवा डार्क चेरी अशा नव्या कलर फिनिशचीही चर्चा आहे.
या इव्हेंटमधलं सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे कंपनीचा पहिलावहिला फोल्डेबल आयफोन, जो आयफोन अल्ट्रा या नावाने सादर होईल अशी शक्यता आहे. बुक-स्टाइल असलेल्या या फोनमध्ये बाहेरच्या बाजूला जवळपास 5.5 इंचाचा डिस्प्ले आणि आतल्या बाजूला 4:3 आस्पेक्ट रेशिओ असलेली 7.8 इंचाची स्क्रीन असेल असे सांगितले जात आहे. यात टायटेनियम आणि ॲल्युमिनियम फ्रेम वापरली जाऊ शकते. लीक्सनुसार एप्पल जवळपास दिसणार नाही अशी क्रीज आणि टिकाऊ हिंज तयार करण्यावरही काम करत आहे. स्लिम डिझाईनमुळे या फोल्डेबल फोनमध्ये तीनऐवजी फक्त दोन रिअर कॅमेरे आणि फेस आयडीऐवजी टच आयडी दिला जाऊ शकतो. या फोनची सुरुवातीची किंमत 2,000 डॉलर, म्हणजे साधारण 1.9 लाख रुपये किंवा त्याहून जास्त असू शकते असा अंदाज आहे.
याशिवाय कंपनी एप्पल वॉच सिरीज 12 सुद्धा लाँच करू शकते, ज्यात नवं एस-सिरीज चिप, आधीपेक्षा चांगली बॅटरी लाईफ, नवे हेल्थ आणि फीटनेस फीचर्स तसेच नवे फिनिश आणि बँड ऑप्शन्स मिळतील असे सांगितले जात आहे. एअरपॉड्स 5 सुद्धा दोन व्हेरिअंटमध्ये - एक ॲक्टिव्ह नॉइज कँसिलेशनसह आणि दुसरा त्याशिवाय - सादर होऊ शकतात. आयओएस 27 च्या उपलब्धतेबाबतही अधिकृत माहिती याच इव्हेंटमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे.
हा कार्यक्रम कॅलिफोर्नियाच्या क्युपर्टिनोमधल्या एप्पल पार्कच्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये होणार आहे. मुख्य भाषण सकाळी 10 वाजता (PT) सुरू होईल, जे भारतात रात्री 10:30 वाजता (IST) सुरू होईल. यूजर्स ॲपलच्या अधिकृत वेबसाईटवर, युट्यूब चॅनेलवर तसेच एप्पल टिव्हीवरही या इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग बघू शकतील.