EPFO चे नवे नियम: वर्षभर नोकरी झाली की PF मधून 75% रक्कम काढता येणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF काढण्याची प्रोसेस सोपी केली असून आजारपण, शिक्षण, लग्न आणि घरासाठी पैसे काढण्याचे नियम शिथिल केले आहेत.
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने PF मधून पैसे काढण्याची प्रोसेस आधीपेक्षा खूपच सोपी केली आहे. आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किचकट प्रक्रिया होती, पण आता गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना लगेच पैसे काढता येणार आहेत.
घरात अचानक आजारपण उद्भवणे, मुलांची फी भरायची असणे किंवा घरी लग्नकार्य असणे अशा प्रसंगी हातात पैसे नसतात, अशा वेळी PF चे पैसेच उपयोगी पडतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन EPFO ने नियम शिथिल केले आहेत.
नव्या नियमानुसार कंपनीत 12 महिने म्हणजे एक वर्षाची सेवा पूर्ण झाली की कर्मचाऱ्याला PF मधून अडव्हान्स काढता येतो. आधी यासाठी जास्त वाट पाहावी लागत असे. PF खात्यात कर्मचाऱ्याचा वाटा आणि कंपनीचा वाटा असे दोन प्रकारचे पैसे जमा होतात, त्यावर व्याजही मिळते. या एकूण जमा रकमेच्या 75% पर्यंत रक्कम अडव्हान्स म्हणून काढता येते. म्हणजे एखाद्याच्या खात्यात 4 लाख रुपये जमा असतील, तर त्याला 3 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.
EPFO ने गरजांचे काही प्रकार केले आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे आजारपण. कर्मचारी स्वतः किंवा घरातील कोणी आजारी असल्यास उपचारासाठी PF मधून पैसे काढता येतात आणि यासाठी कोणतीही मर्यादा नाही, म्हणजे कितीही वेळा पैसे काढता येतात.
मुलांच्या शिक्षणासाठी आणि कॉलेजच्या फीसाठी नोकरीच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा PF मधून पैसे काढता येतात, त्यामुळे दरवर्षी फी भरायला लागले तरी अडचण येणार नाही. लग्नासाठी 5 वेळा पैसे काढता येतात आणि हे स्वतःचे, मुलाचे किंवा भावाचे लग्न असू शकते.
घर घेणे, फ्लॅट किंवा प्लॉट घेणे, घर बांधणे यासाठीही PF मधून अडव्हान्स मिळतो. होम लोनची परतफेड करण्यासाठी किंवा घराची डागडुजी, नूतनीकरण करण्यासाठीही पैसे काढता येतात. घराच्या कामासाठी नोकरीच्या काळात 5 वेळा पैसे काढता येतात. याशिवाय EPFO ने सांगितलेल्या काही खास परिस्थितीत एका वर्षात 2 वेळाही अडव्हान्स घेता येतो.
ही संपूर्ण प्रोसेस आता ऑनलाईन झाली असून कुठेही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. मात्र अर्ज करण्याआधी PF खात्याला आधार, पॅन आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. KYC पूर्ण असेल तरच पैसे लवकर मिळतात, त्यामुळे KYC नसेल तर आधी ते पूर्ण करून घ्यावे. पात्रता पूर्ण झाल्यावर अर्ज केल्यास काही दिवसांतच पैसे बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी PF चे पैसे आता लगेच हातात येणार आहेत आणि हा नियम अनेक कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.