पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेआधी NCPI चे १७ बंडखोर खासदार भाजपमध्ये जाणार, खासदार बसुनिया यांचा दावा
कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावा केला असून त्यांच्या घराबाहेर निदर्शने आणि टीएमसी कार्यालयाची जाळपोळ झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकीय हालचाली एकदम वेगात सुरू झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून (TMC) बाहेर पडून 'नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) मध्ये गेलेले खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी एक मोठा दावा केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, येणाऱ्या दुर्गापूजेच्या आधी NCPI चे १७ खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत.
बसुनिया यांच्या म्हणण्यानुसार, या १७ खासदारांपैकी ३ अल्पसंख्याक खासदार मात्र थेट भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. यात अबू ताहीर आणि खलीलुर रहमान या खासदारांचा समावेश आहे. या दोघांना वेगवेगळी जबाबदारी दिली जाईल आणि ते पक्षाबाहेर राहून रालोआ (NDA) सरकारला पाठिंबा देत राहतील. या दोन्ही खासदारांच्या मतदारसंघांत अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे ते थेट भाजपमध्ये गेले तर स्थानिक पातळीवर त्यांना अडचणी येऊ शकतात, म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे असे बसुनिया यांनी स्पष्ट केले.
आपल्या दाव्याबाबत अधिक बोलताना बसुनिया म्हणाले, "भाजपनेच आम्हाला तृणमूल सोडून NCPI मध्ये जायला सांगितले होते. पण खरे तर आम्हा सगळ्यांची इच्छा थेट भाजपमध्येच जाण्याची होती. सगळे नीट पार पडले तर आमच्या २० पैकी १७ खासदार दुर्गापूजेआधी भाजपचा झेंडा हातात घेतील."
कूचबिहारचे खासदार असलेले बसुनिया रविवारी कडक पोलीस बंदोबस्तात आपल्या घरी परतले. ते घरी परतल्याची बातमी पसरताच सिताई भागात राजकीय तणाव वाढला. सिताई बस स्टँडजवळच्या टीएमसी कार्यालयात कथित तोडफोड करून आग लावण्यात आली. स्थानिक लोक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या एका गटाने खासदार बसुनिया यांच्या घरासमोर जमून जोरदार निदर्शने केली.
याआधी १४ जून रोजी तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी तुलनेने कमी ओळखल्या जाणाऱ्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी या खासदारांनी केंद्रातील सत्ताधारी एनडीएलाही पाठिंबा जाहीर केला होता. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी २० पैकी किमान १४ खासदारांनी एकाच वेळी पक्षात सामील होणे गरजेचे असते. त्यामुळे १७ खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा याच दोन-तृतीयांश तरतुदीशी जोडलेला आहे.
बसुनिया यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, २० NCPI खासदारांपैकी तीन अल्पसंख्याक खासदार औपचारिकपणे भाजपमध्ये सामील होणार नाहीत. आपापल्या मतदारसंघातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती हे याचे कारण त्यांनी सांगितले. अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे तिघेही भाजपमध्ये न जाता बाहेरूनच एनडीएला पाठिंबा देतील. या तिन्ही नेत्यांना पुढे जाऊन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या किंवा खाती मिळण्याची शक्यता आहे.