डुकाटीची ही अॅडव्हेंचर बाइक शहरापासून ऑफ-रोडिंगपर्यंत सगळीकडे भारी! 890cc V-Twin इंजिनची खासियत
डुकाटी मल्टीस्ट्राडा V2 ही मिडलवेट ADV सेगमेंटमधली बाइक शहरातल्या रोजच्या वापरापासून हायवे टूरिंग आणि हलक्या ऑफ-रोडिंगपर्यंत सगळीकडे चांगली कामगिरी करते.
अॅडव्हेंचर बाइक म्हणलं की डोळ्यासमोर लगेच मोठ्या आणि जड मोटरसायकली येतात. पण रोज शहरात वापरता येईल, त्याचबरोबर हायवेवर लांबचं टूरिंग आणि हलकं ऑफ-रोडिंगही सहज जमेल अशी बाइक हवी असेल, तर मिडलवेट ADV सेगमेंट सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. याच वर्गात डुकाटी मल्टीस्ट्राडा V2 ही बाइक येते. ही बाइक परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि वापरातली सोय यांचा चांगला ताळमेळ घालते, त्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठीही ती योग्य ठरते.
या बाइकमध्ये डुकाटी कंपनीचं हलकं 90-डिग्री V-Twin इंजिन बसवलं आहे. 890cc ची ही मोटर 115hp इतकी पॉवर आणि 67.9lb-ft टॉर्क देते. सोबतीला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आहे, ज्यामुळे गिअर बदलताना क्लच न दाबताही सहज गिअर बदलता येतो. खालच्या गिअर्समध्ये रेशो तुलनेने छोटा ठेवल्यामुळे एक्सलेरेशनला फायदा होतो, म्हणजे बाइक पटकन वेग पकडते, तर 6th गिअर मुद्दाम लांब ठेवलाय जेणेकरून हायवेवर आरामात क्रूझिंग करता यावं आणि इंजिनवर ताण कमी येईल. या इंजिनमध्ये Desmodromic वाल्व्ह नाहीत, त्यामुळे इतर डुकाटी इंजिनांच्या तुलनेत या बाइकच्या देखभालीचा खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
चेसिसबाबत बोलायचं झालं तर बाइकला अॅल्युमिनियम मोनोकोक फ्रेम आणि स्टील-ट्रेलिस सबफ्रेम दिलाय. हा चेसिस हलका असल्यामुळे बाइकची हाताळणी अधिक चपळ होते. व्हीलबेस 61.9 इंच असून rake angle 24.3 डिग्री आहे. यामुळेच वळणांवर बाइक पटकन दिशा बदलू शकते आणि शहरातल्या ट्रॅफिकमध्येही ही बाइक मोठ्या ADV बाइक्सइतकी अवघड वाटत नाही, म्हणजे गर्दीच्या रस्त्यांवरही ती सहज चालवता येते. सस्पेन्शनसाठी 45mm अॅडजस्टेबल Marzocchi इन्व्हर्टेड फोर्क्स आणि Sachs मोनोशॉक देण्यात आलाय.
फीचर्सच्या बाबतीतही ही बाइक प्रीमियम आहे. कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यासारखी इलेक्ट्रॉनिक फीचर्स यात मिळतात. शिवाय अनेक राइडिंग मोड्स, 5-इंच TFT डिस्प्ले, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हीटेड ग्रिप्स आणि फ्रंट फॉग लॅम्प्सही आहेत. बाइकचं डिझाइन आक्रमक असून फेअरिंग आणि एरोडायनॅमिक डिफ्लेक्टर्समुळे लांबच्या प्रवासात वाऱ्याचा त्रासही कमी होतो, म्हणजे लांब हायवे टूरिंगमध्ये रायडरला जास्त दमछाक होत नाही.
किंमतीच्या बाबतीत मात्र ही बाइक महाग आहे. डुकाटी मल्टीस्ट्राडा V2 ची सुरुवातीची किंमत 16,995 डॉलर इतकी आहे, जी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जास्त आहे. पण हलकं चेसिस, आरामदायी एर्गोनॉमिक्स, दमदार इंजिन आणि प्रीमियम फीचर्स यामुळे ही बाइक रोजच्या वापरापासून ते वीकेंड टूरिंगपर्यंत वेगवेगळ्या भूमिका सहज निभावू शकते, असं म्हणता येईल.