गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

'धुरंधर'नंतर फीस वाढवल्याने अक्षय खन्ना 'दृश्यम 3'मधून बाहेर? जयदीप अहलावतने केला खुलासा

'दृश्यम 3'मध्ये जयदीप अहलावतच्या एन्ट्रीमुळे अक्षय खन्नाच्या एक्झिटची चर्चा पुन्हा रंगली, जयदीपने स्वतः सगळं स्पष्ट केलं.

'धुरंधर'नंतर फीस वाढवल्याने अक्षय खन्ना 'दृश्यम 3'मधून बाहेर? जयदीप अहलावतने केला खुलासा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अजय देवगणचा 'दृश्यम 3' हा सिनेमा सध्या फुल चर्चेत आहे. ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली दिसतेय. या सिनेमात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत काही नवीन चेहरेही जोडले गेलेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता जयदीप अहलावत. त्याच्या एन्ट्रीमुळे अक्षय खन्नाच्या एक्झिटची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की जयदीप अहलावत 'दृश्यम 3'मध्ये अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेणार आहे. त्यात भर म्हणजे 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाने मानधन वाढवलं आणि त्यामुळेच तो 'दृश्यम 3'मधून बाहेर पडल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. मात्र आता खुद्द जयदीप अहलावतनेच या सगळ्या चर्चेवर स्पष्टीकरण देत पूर्ण चित्र समोर आणलं आहे.

९ सप्टेंबरला गोव्यात 'दृश्यम 3'च्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जयदीप अहलावतला अक्षय खन्नासोबत होणाऱ्या तुलनेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर जयदीपने स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा त्याला ही भूमिका ऑफर झाली, तेव्हा तो अक्षयच्या पात्राची जागा घेतोय असं त्याला कधीच सांगण्यात आलं नव्हतं.

जयदीपच्या म्हणण्यानुसार, एका पात्राची कथा जिथे संपते, तिथून दुसऱ्या पात्राची वेगळी कथा सुरू होते. त्याच्या व्यक्तिरेखेचा स्वतःचा वेगळा प्रवास आहे, स्वतंत्र ओळख आहे आणि वेगळी नातीही आहेत. त्यामुळे अक्षय खन्नाने साकारलेल्या पात्राशी त्याची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही, असं तो म्हणाला.

चित्रपटात तब्बूने साकारलेल्या मीरा या पात्रासोबत जयदीपच्या व्यक्तिरेखेचं नातंही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आधीच्या पात्राशी तुलना करण्याचा कोणताही दबाव आपल्यावर नसल्याचं जयदीपने सांगितलं. 'दृश्यम 3'मध्ये जयदीप अहलावत पोलीस अधीक्षक (गुन्हे शाखा) राजवीर सिंग तोमर या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एन्ट्री विजय साळगावकरच्या आयुष्यातील अडचणी आणखी वाढवणारी दिसतेय, त्यामुळे ही व्यक्तिरेखा कथेत नेमकं काय करणार याची उत्सुकता वाढलीय.

डिसेंबर २०२५मध्ये अक्षय खन्ना 'दृश्यम 3'मधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सांगितलं होतं की करार झाल्यानंतर अक्षयसोबत काही मुद्द्यांवर मतभेद झाले, ज्यात मानधन आणि त्याच्या भूमिकेशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश होता. यानंतर निर्मात्यांनी जयदीप अहलावतला सिनेमात घेतलं. मात्र त्यावेळीही दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी स्पष्ट केलं होतं की जयदीप अक्षय खन्नाची जागा घेत नाहीये, तर त्याच्यासाठी स्वतंत्र आणि नवीन पात्र लिहिण्यात आलं आहे.

त्यामुळे 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाची फीस वाढल्याने त्याचा 'दृश्यम 3'मधून पत्ता कट झाला, या चर्चांपेक्षा जयदीप अहलावतची भूमिका पूर्णपणे स्वतंत्र असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. विजय साळगावकरसमोर राजवीर सिंग तोमर नेमकं कोणतं नवं आव्हान उभं करणार, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ