LSE News : डॉ. बाबासाहेबांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मास्टर्सचा अभ्यासक्रम करणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टरेट देऊन गौरवलं होतं, त्याच संस्थेत आता कल्याणचे खासदार आणि शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे मास्टर्सचा अभ्यासक्रम करणार आहेत.
अभ्यासक्रमाच्या पहिल्याच दिवशी खासदार डॉ. शिंदे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या कॅम्पसमध्ये गेले आणि तिथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी आधी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी मास्टर्सच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. या शिक्षणातून जे ज्ञान आणि अनुभव मिळेल, त्याचा उपयोग महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
डॉ. आंबेडकरांचं "शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते पितो तो गर्जना करतो" हे वाक्य आपल्याला सतत आठवत राहतं, असं डॉ. शिंदे म्हणाले. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभं राहिल्यावर या शब्दांचा अर्थ आणखी खोलवर जाणवतो, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातून आलेला खासदार म्हणून नव्हे, तर आधी एक विद्यार्थी म्हणून त्या जागी उभं राहताना आपल्याला अभिमान वाटला, असं डॉ. शिंदे यांनी नमूद केलं. विचार आणि जिद्द माणसाला किती लांबवर घेऊन जाऊ शकते, याची जाणीव या क्षणी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
ही आपली दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचं डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केलं. एम.एस. ऑर्थोपेडिक केल्यानंतर वैद्यकशास्त्रातून आजार कसे बरे करायचे हे शिकायला मिळालं होतं. आता गुंतागुंतीचे आर्थिक प्रश्न आणि धोरणं कशी हाताळायची, हे समजून घेण्यासाठी त्यांनी हा अभ्यासक्रम निवडला आहे.
क्षेत्र वेगळं असलं तरी शिकण्याची आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची आपली उत्सुकता तशीच कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. लेक्चर, ग्रुप डिस्कशन आणि कॉलेजच्या दिवसांसारखी धावपळ पुन्हा अनुभवायला मिळणार, याचा आनंद असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. हे शिक्षण महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी वापरण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पदवी मिळाली, नोकरी लागली किंवा एखादं पद मिळालं की शिक्षण संपलं, असं तरुणांनी कधीच समजू नये, असा संदेश त्यांनी दिला. "मनाची जोपासना हे माणसाच्या अस्तित्वाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे" या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, जग झपाट्याने बदलतंय, त्यामुळे जिज्ञासू राहा आणि सतत शिकत राहा, असा सल्ला त्यांनी जेन झी पिढीला दिला.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगभरात ओळखली जाणारी शिक्षणसंस्था असून याच संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टरेट देऊन गौरवलं होतं. त्यामुळे याच परिसरात, त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभं राहून नव्या शिक्षणाची सुरुवात करणं, हा खासदार डॉ. शिंदे यांच्यासाठी एक भावनिक आणि महत्त्वाचा क्षण ठरला. डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यानंतर आता अर्थशास्त्र आणि धोरणांचं शिक्षण घेत, राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांसाठी नवं ज्ञान मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.