दिशा सालियन प्रकरण: गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणायला हवं, निलेश राणेंची प्रतिक्रिया
CBIने दिशा सालियन प्रकरणात FIR दाखल केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी भूमिका मांडली, तर सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानी नोटीस पाठवल्याने वातावरण तापलं.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर CBIने या प्रकरणात FIR दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. तपास अजून सुरू असताना नेमका आरोपी कोण आहे किंवा कोण नाही, याबद्दल आत्ताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
निलेश राणे यांनी सांगितलं की, CBIने मालवणी पोलिसांकडून CDR, टॉवर लोकेशन रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट अशी कागदपत्रं मागवली आहेत. या सगळ्या कागदपत्रांच्या आधारावर आता CBI तपास करणार असून, या प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे, हे तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल, असं त्यांनी नमूद केलं.
'ज्यांनी गुन्हा केलाय, त्या सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे. पण ते नेमके कोण असावेत, हे मी आत्ता सांगू शकत नाही. तपासानंतरच ते समोर येईल,' अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली.
याशिवाय सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी कोर्टासमोर काही पुरावे सादर केल्याचाही उल्लेख राणे यांनी केला. प्रकरणातील काही बाबी जुळत नसल्याचा दावा करत, पुढच्या कोर्ट प्रक्रियेत पुरावे आणि तथ्यांवर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात CBIने FIR दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. हायकोर्टाने 2 सप्टेंबरला CBIला तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर FIR नोंदवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली. शनिवारी ते वकिलांसह मातोश्रीवर पोहोचले. या नोटीसमध्ये सात दिवसांत सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली असून, माफी न मागितल्यास 500 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नोटीसच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आणि काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना ओळखत नसल्याचं सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. एका बाजूला सतीश सालियन यांची कायदेशीर भूमिका, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांनी आरोपांना दिलेला नकार आणि आता सुरू झालेला CBI तपास, यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. CBIच्या तपासातून पुढे काय माहिती समोर येते आणि कोर्ट प्रक्रियेत पुढे काय घडतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.