"सगळे माझा पाठलाग करत होते..."; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
दिल्लीत रात्रीच्या वेळी महिला खरोखर किती सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी एका कंटेंट क्रिएटरने महिलेचा वेश परिधान करुन शहरात फेरफटका मारला. यावेळी आलेला अनुभव त्याने व्हिडिओतून शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देशाची राजधानी असलेली दिल्ली रात्रीच्या वेळी महिलांसाठी असुरक्षित मानली जाते आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तिथे नेहमीच चर्चेत असतो. हीच वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी दिल्लीतील एका कंटेंट क्रिएटरने एक वेगळाच सामाजिक प्रयोग केला. रात्रीच्या वेळी शहरात महिला खरोखर किती सुरक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी या तरुणाने चक्क महिलेचा वेश परिधान केला आणि शहरात फेरफटका मारत सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर असलेला मुद्दा आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा प्रयोग करण्यात आला.
या क्रिएटरने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरुन जाताना अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. त्याने एक ड्रेस परिधान केला होता, तसेच चेहऱ्यावर मेकअप करुन दाढी लपवण्यासाठी अर्धा चेहरा स्कार्फने झाकला होता. साधारण दोन तास तो बाईकवरुन फेरफटका मारत होता आणि आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात टिपत होता. या दोन तासांच्या फेरफटक्यादरम्यान त्याला अनेक वाईट अनुभव आले, जे त्याने नंतर व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले.
बाईकवर फिरत असताना रिक्षाचालक आणि इतर काही ड्रायव्हर्स सतत त्याच्याकडे पाहत असल्याचे त्याने सांगितले. दोन माणसांनी आधी त्याच्याकडे पाहिले आणि नंतर जवळ येण्याच्या प्रयत्नात त्याचा पाठलाग करू लागले, असेही त्याने नमूद केले. प्रवासादरम्यान आणखी एका माणसाने त्याच्याजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटना घडत असताना त्याने आपला फोन कॅमेरा सुरु ठेवला होता आणि सगळे प्रसंग टिपले.
परिस्थिती त्याहून भीषण तेव्हा झाली जेव्हा एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा त्याच्या बाईकच्या बरोबरीने चालवायला सुरुवात केली. मात्र आपला दुसरा मित्र मागून हा सगळा प्रकार व्हिडिओत शूट करत आहे हे लक्षात येताच तो रिक्षाचालक तिथून लगेच निघून गेला, अशी माहिती क्रिएटरने दिली. आपला अनुभव शेअर करताना क्रिएटर शेवटी म्हणाला, "हे खरंच खूप भीतीदायक होत आहे. मला वाटतं आपण हे थांबवलं पाहिजे."
या व्हिडिओवरुन महिलांच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. दिल्लीत आजही रात्रीच्या वेळी महिलांचे घराबाहेर पडणे सुरक्षित मानले जात नाही. यामागे महिलांचे कपडे जबाबदार नसून पुरुषांची वाईट प्रवृत्ती जबाबदार असल्याचे या प्रयोगातून अधोरेखित होते. काही लोकांच्या वाईट विचारांमुळे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावले जाणे किती भीषण असते, हेच या व्हिडिओतून दिसून येते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडल्यानंतर महिलांसोबत काय काय घडू शकते याची एक झलक क्रिएटरने या व्हिडिओतून दाखवली असून ती पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ @bejaintle या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे आणि सोशल मीडियावर तो झपाट्याने पसरला आहे.