एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी आता आधार बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक, 1 ऑक्टोबरपासून नियम
अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर बुक करायचा असेल तर आधीच बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करून ठेवा, अन्यथा सिलिंडर मिळणार नाही.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. अनुदानित दरात मिळणारा घरगुती एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी यापुढे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (BAA) करणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही माहिती दिली असून, हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, सबसिडीसह नियंत्रित किरकोळ किमतीत सिलिंडर हवा असेल तर ग्राहकांना आधी आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी लागेल. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा काही करण्याची गरज नाही, त्यांचे बुकिंग पूर्वीसारखेच सुरू राहील. मात्र ज्यांनी अजून ही पडताळणी केलेली नाही, त्यांना ऑथेंटिकेशन पूर्ण केल्याशिवाय अनुदानित दरात सिलिंडरचे बुकिंग करता येणार नाही.
हा निर्णय का घेण्यात आला, याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, अनुदानाचा फायदा योग्य आणि पात्र कुटुंबांपर्यंतच पोहोचावा, हा या प्रक्रियेमागचा मुख्य उद्देश आहे. आधार बायोमेट्रिक पडताळणीमुळे ग्राहकाची ओळख अधिक अचूकपणे तपासता येते, त्यामुळे दुबार किंवा अपात्र एलपीजी कनेक्शन शोधून त्यावर कारवाई करणे शक्य होईल, असे मंत्रालयाने सांगितले. तसेच अनुदानित घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक किंवा औद्योगिक कामासाठी होणारा गैरवापर रोखणे आणि सबसिडी वितरणात अधिक पारदर्शकता आणणे हाही या नियमाचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना ही पडताळणी पूर्ण करण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे सिलिंडर घरपोच आणणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मदतीने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घेता येईल. दुसरा पर्याय म्हणजे ग्राहक स्वतःच्या एलपीजी वितरकाच्या शोरूममध्ये जाऊन ही पडताळणी पूर्ण करू शकतात. तिसरा पर्याय म्हणजे मोबाईल ॲपद्वारे घरबसल्याही ही प्रक्रिया करता येईल. इंडेन ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारतगॅस ग्राहकांसाठी HelloBPCL आणि एचपी गॅस ग्राहकांसाठी HP PAY हे ॲप वापरता येतील.
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, या नियमामागचा हेतू पात्र कुटुंबांना एलपीजी सेवा नाकारणे हा नसून, अनुदानाचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवणे हा आहे. त्यामुळे अनुदानित घरगुती एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांनी आपले बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन झाले आहे की नाही, हे आधीच तपासून घेणे गरजेचे आहे. 1 ऑक्टोबर 2026 ही अंतिम मुदत असल्याने ग्राहकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे फायद्याचे ठरेल.