गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:40 IST

धान पिकावर खोडकिडी, करपा रोगाचे संकट; मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर खोडकिडी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.

धान पिकावर खोडकिडी, करपा रोगाचे संकट; मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे राहिले आहे. पिकावर खोडकिडी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी सर्वात आधी मदतीला धावून जाणारे नेते अशी मुनगंटीवार यांची ओळख आहे.

पत्रात मुनगंटीवार यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला द्यावेत. दुसरी मागणी अशी की, पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी. आणि तिसरी मागणी म्हणजे खोडकिडी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी लागणारी कीटकनाशके आणि बुरशीनाशके कृषी विभागाकडून मोफत उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांचे उभे धान पीक वाचवण्यासाठी शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन यंत्रणांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.

शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च करून धानाचे पीक उभे केले होते, मात्र ऐन हंगामातच या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. वेळेवर बंदोबस्त न झाल्यास उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी तसेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे लवकर पूर्ण करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पंचनाम्यांच्या आधारे नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित निकषांनुसार आर्थिक मदत देण्याची कार्यवाही व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढील नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने खोडकिडी नियंत्रणासाठी कीटकनाशके आणि करपा रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके मोफत द्यावीत. तसेच कृषी विभागाच्या पथकांनी गावोगावी आणि प्रत्यक्ष शेतांवर जाऊन शेतकऱ्यांना औषधांचा योग्य वापर, फवारणीचे प्रमाण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्यापूर्वीच शासनाने प्रभावी उपाययोजना करून युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान केवळ आर्थिक नसून त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर आणि पुढच्या हंगामाच्या आशेवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे पंचनामे, तातडीची आर्थिक मदत, मोफत औषधे, गावनिहाय पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन आणि पुढील नुकसान रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय याबाबत शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षांचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री स्तरावरून याची तातडीने दखल घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे उभे पीक वाचवण्यासाठीच्या उपाययोजनांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ