डेव्हिड वॉर्नर नेपाळ प्रीमियर लीग खेळणार, काठमांडू गोरखाजसोबत करार पक्का
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आता नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळणार असून काठमांडू गोरखा संघाने त्याच्याशी करार केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आता नेपाळ प्रीमियर लीगमध्ये (NPL) खेळताना दिसणार आहे. काठमांडू गोरखा या फ्रँचायझीसोबत त्याने करार केला असून, या लीगमध्ये खेळायला मिळणार असल्याबद्दल त्याने स्वतःचा आनंद बोलून दाखवला आहे. नेपाळ प्रीमियर लीगला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवारी, म्हणजे १५ सप्टेंबरला काठमांडू गोरखाज फ्रँचायझीने सोशल मीडियावरून अधिकृत घोषणा करत वॉर्नरचा संघात समावेश झाल्याची पुष्टी केली.
ऑस्ट्रेलिया संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये मोठ्या प्रमाणात धावा करणारा वॉर्नर आता पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. काठमांडू गोरखा संघाने मंगळवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत वॉर्नरच्या सहभागाची घोषणा केली. या व्हिडिओत वॉर्नरने आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, नमस्कार सर्वांना, नेपाळमध्ये येऊन काठमांडू गोरखा संघात सामील होताना मला खूप आनंद होतोय. मला माहितेय की हा काळ अनेक लोकांसाठी खूप अवघड होता, आणि मला वाटतं की एनपीएलमुळे थोडा आनंद मिळेल आणि लोकांना एकत्र येण्याची संधी मिळेल. मी इथल्या उत्साहाबद्दल आणि चाहत्यांबद्दल खूप ऐकलंय. हे सगळं अनुभवायला मी उत्सुक आहे. तुम्हा सगळ्यांना भेटायला आणि माझ्या संघासोबत मैदानावर खेळायला मी खूप आतुर आहे.
काठमांडू गोरखाजचे कार्यकारी संचालक अनुभव स्वर सिरोहिया यांनीही वॉर्नरसोबतच्या या करारावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, वॉर्नरचं संघात येणं एका रात्रीत झालेलं नाहीये, यासाठी गेले अनेक महिने चर्चा सुरू होती. डेव्हिड वॉर्नरसारख्या वर्ल्ड चॅम्पियनला नेपाळमध्ये आणणं म्हणजे इथल्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा ठरेल, असं ते म्हणाले. त्याच्या येण्यामुळे नेपाळी क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल आणि चाहत्यांसाठीही ही एक मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं.
३९ वर्षांच्या डेव्हिड वॉर्नरने २००९ साली ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं होतं, तर त्याने आपला शेवटचा सामना २०२४ मध्ये खेळला. ऑस्ट्रेलियासाठी त्याने ११२ कसोटी सामन्यांत ८,७८६ धावा केल्या आहेत. यासोबतच १६१ एकदिवसीय सामन्यांत ६,९३२ धावा आणि ११० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३,२७७ धावा त्याच्या नावावर आहेत. कसोटीत त्याने २६ शतकं, एकदिवसीय सामन्यांत २२ शतकं आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एक शतक झळकावलं आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले असून, २०२१ चा टी-२० विश्वचषकही त्याच्या नावावर आहे. तसेच २०२१-२३ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही त्याने ऑस्ट्रेलियासाठी जिंकला होता.