'दशमी' सिनेमातून उलगडणार बाप-लेकीचं भावनिक नातं; मकरंद अनासपुरे, गौरी इंगवले मुख्य भूमिकेत
केएनके बॉक्स निर्मित 'दशमी' या मराठी सिनेमातून बाप आणि लेकीच्या नात्यातील प्रेम आणि त्यागाची गोष्ट मांडली जाणार आहे. मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
बाप आणि लेक यांच्यातलं नातं म्हणजे प्रेम, माया आणि भावनांनी बांधलेला एक खास धागा असतो. लेकीच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहणारा बाबा आणि वडिलांच्या प्रेमातच आपलं संपूर्ण जग बघणारी लेक, या दोघांमधला हळवा बंध आता 'दशमी' या येणाऱ्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
केएनके बॉक्स प्रस्तुत या सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गौरी इंगवले हे बाप-लेकीची भूमिका करणार आहेत. प्रभाकर आणि लक्ष्मी अशी या दोन व्यक्तिरेखांची नावं असून, त्यांच्यातलं प्रेम, त्याग आणि भावनिक जवळीक ही कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. योगेश पांडुरंग भोसले यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, 'दशमी' ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कथेत प्रभाकर हा स्वतःची सगळी स्वप्नं बाजूला ठेवून आपली मुलगी लक्ष्मीने डॉक्टर व्हावं यासाठी आयुष्यभर मेहनत करताना दिसतो. मुलीच्या भविष्यासाठी तो अनेक अडचणींना तोंड देतो. दुसरीकडे लक्ष्मी ही मेडिकलची विद्यार्थिनी असून, वडिलांनी घेतलेल्या कष्टांची तिला पूर्ण जाणीव आहे. वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ती स्वतःचं मानून ते पूर्ण करण्यासाठी झटत असते.
प्रभाकरच्या भूमिकेबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, "'प्रभाकर' या भूमिकेतून एका वडिलांचं मुलीवरील प्रेम आणि तिच्यासाठीची धडपड अनुभवता आली. मुलीसमोर खंबीर राहूनही आतून तुटणारा प्रभाकर साकारताना हा प्रवास मनाला भिडणारा होता." त्यांच्या या भूमिकेतून मुलीच्या भविष्यासाठी झटणाऱ्या वडिलांची भावनिक बाजू पाहायला मिळेल.
लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या गौरी इंगवलेने आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं की, लक्ष्मी आणि तिच्या वडिलांचं नातं साधं असलं तरी मनाला भिडणारं आहे. लक्ष्मीच्या प्रत्येक स्वप्नामागे तिच्या वडिलांचे कष्ट आहेत, याची तिला पूर्ण जाणीव आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटानंतर लक्ष्मीचं संपूर्ण विश्व बदलतं, आणि या बदलासोबतच वडिलांबद्दलचं तिचं प्रेम आणि त्यांच्याशी असलेली भावनिक जवळीक साकारताना हा अनुभव खूप भावनिक होता, असं गौरीने सांगितलं.
'दशमी'मधील प्रभाकर आणि लक्ष्मीचा हा प्रवास फक्त एका बाप-लेकीची गोष्ट नाही, तर मुलीच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक वडिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी ही कथा आहे. मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले यांच्या अभिनयातून हे बाप-लेकीचं नातं पडद्यावर किती जिवंत उभं राहतं, याबद्दलची उत्सुकता आता वाढली आहे. 'दशमी' हा मराठी सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.