पनीर बिर्याणी घरीच बनवा हॉटेलसारखी चवदार, सोपी रेसिपी
शाकाहारी जेवणात खास मानला जाणारा पदार्थ म्हणजे पनीर बिर्याणी. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी कशी बनवायची ते पहा.
पनीर हा पदार्थ जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा असतो. चिकन बिर्याणी तर अनेकांनी अनेकदा खाल्लेली असते, पण यंदा एकदा पनीर बिर्याणी करून बघायला हरकत नाही. शाकाहारी जेवणात पनीर बिर्याणीला खास स्थान आहे. सुगंधी बासमती तांदूळ, मसालेदार पनीर, तळलेला कांदा आणि विविध मसाल्यांचा नीट वापर केला की या बिर्याणीला भारी चव आणि सुगंध येतो. मांसाहारी बिर्याणीला पर्याय म्हणून तर ही बिर्याणी खाल्ली जातेच, पण स्वतंत्रपणेही ती अनेकांना आवडते.
घरी बिर्याणी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे तांदूळ पूर्ण शिजवायचा नाही. साधारण ७० ते ८० टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आणि मग तो पनीरच्या मसाल्यासोबत दम देऊन शिजवायचा. असं केलं की तांदळाचा प्रत्येक दाणा मोकळा राहतो आणि मसाल्याची चव त्यात नीट भिनते. दही, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा यामुळे बिर्याणीला समृद्ध चव मिळते. पनीर आधी हलके परतून घेतलं की त्याला छान पोत येतो आणि मसाल्यात मिसळल्यावर त्याची चव आणखी खुलते. रविवारचं खास जेवण असो, पाहुण्यांसाठीचा मेन्यू असो किंवा एखादा खास प्रसंग, या सगळ्यासाठी पनीर बिर्याणी नक्कीच बनवता येते.
यासाठी लागणारं साहित्य असं - बासमती तांदूळ २ कप, पनीर २५० ग्रॅम, कांदे २ ते ३, टोमॅटो १, दही अर्धा कप, आले-लसूण पेस्ट १ टेबलस्पून, हिरव्या मिरच्या २, पुदिन्याची पाने अर्धा कप, कोथिंबीर अर्धा कप, दूध पाव कप, केशर ८ ते १० काड्या, तूप २ टेबलस्पून, तेल २ टेबलस्पून, जिरे अर्धा टीस्पून, तमालपत्र १, दालचिनी १ छोटा तुकडा, लवंग ३ ते ४, वेलची २, बिर्याणी मसाला १ ते दीड टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, हळद पाव टीस्पून, मीठ चवीनुसार आणि लिंबाचा रस १ टीस्पून.
कृती करताना आधी बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन २० ते ३० मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा. त्यानंतर पाण्यात मीठ आणि थोडे संपूर्ण मसाले घालून तांदूळ ७० ते ८० टक्केच शिजवायचा, पूर्ण शिजवायचा नाही. पाणी काढून तांदूळ बाजूला ठेवावा. पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यांना थोडं मीठ आणि लाल तिखट लावावं. कढईत थोडं तेल किंवा तूप गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतावेत, जास्त वेळ तळू नयेत नाहीतर ते कडक होतात.
त्याच कढईत तेल-तूप घालून जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची घालावी. मग बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून काही मिनिटं परतावं. चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवावा. त्यात हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि मीठ घालावं. आता दही घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. त्यात परतलेलं पनीर, थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालून काही मिनिटं शिजवावं.
एका जाड बुडाच्या भांड्यात आधी पनीरचा मसाला पसरवावा. त्यावर अर्धवट शिजवलेला बासमती तांदूळ घालावा. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना पसरवावा आणि गरजेनुसार असे थर पुन्हा लावावेत. कोमट दुधात केशर भिजवून ते तांदळावर सगळीकडून घालावं. त्यावर थोडं तूप आणि तळलेला कांदा पसरवावा, यामुळे बिर्याणीला छान रंग आणि सुगंध येतो. भांड्यावर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर १५ ते २० मिनिटं दम द्यावा. गॅस बंद केल्यावर ५ मिनिटं झाकण तसंच ठेवावं आणि मग तांदळाचे दाणे न मोडता हलक्या हाताने बिर्याणी मिक्स करावी.