दातांवरचा पिवळेपणा घालवायचाय? लिंबाच्या रसात 'हे' मिसळा, दात होतील लख्ख
रोज ब्रश करूनही दात पिवळेच दिसत असतील तर लिंबाच्या रसात काही घरगुती पदार्थ मिसळून दातांची चमक वाढवता येते.
सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ब्रश केला जातो, तरीसुद्धा अनेकांच्या दातांवरचा पिवळेपणा काही केल्या कमी होत नाही. दातांवर वाढलेल्या या पिवळेपणामुळे हसतानाही ओशाळल्यासारखं वाटतं. सुरुवातीला दात पिवळे पडणे, हिरड्यांमध्ये दुखणे, कीड लागणे किंवा दातांवर पांढरा थर साचणे यासारख्या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण हळूहळू या समस्या वाढत जातात आणि दातांचं आरोग्य बिघडायला लागतं. पिवळे, किडलेले आणि अस्वच्छ दात यामुळे चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं आणि दातांवर पिवळा थर साचला की तोंडाला वासही यायला लागतो.
तंबाखू, गुटखा किंवा दातांची स्वच्छता नीट न राखल्यामुळे लोकांसमोर हसताना लाज वाटते. दात काळे किंवा लाल पडले की मग वेगवेगळ्या टूथपेस्टी वापरून त्यावर उपाय शोधला जातो. पण सतत टूथपेस्ट बदलत राहिल्याने समस्या कमी होण्याऐवजी उलट वाढतच जातात. यावर घरगुती उपाय म्हणजे लिंबाचा रस - यात असे घटक असतात जे दात स्वच्छ करतात आणि पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात.
दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी सगळ्यात आधी दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश केल्यास दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतात आणि दात स्वच्छ राहतात. याशिवाय लिंबू आणि संत्र्याच्या सालीचा वापरही उपयोगी ठरतो, कारण त्यात दात स्वच्छ करणारे घटक असतात. या साली हलक्या हाताने दातांवर घासल्यास दात चकाचक होतात. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करता येतो.
दुसरा उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करणे. एका वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळावा आणि हे मिश्रण ब्रशने किंवा बोटाने हलक्या हाताने दातांवर घासावं. यामुळे दात स्वच्छ होण्यासोबतच वाढत्या दातांच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. मात्र हे मिश्रण दातांच्या इनॅमलवर जपून लावावं.
तिसरा उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवणे. हे मिश्रण दातांवर लावून हलक्या हाताने मसाज करावी, त्यामुळे दात स्वच्छ व्हायला मदत होते. मसाज झाल्यावर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवावं. हा उपायही आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा, कारण जास्त वेळा केल्यास दातांच्या इनॅमलला धोका पोहोचू शकतो.
हे उपाय फक्त सर्वसाधारण माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.