चिक्कीचे पैसे मागितल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत हातगाडीवर शेंगदाणे आणि चिक्की विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका तरुणावर काही आरोपींनी चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने सामानाचे पैसे मागितले, याचाच राग आरोपींना आला आणि त्यातूनच हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
जखमी झालेल्या तरुणाचे नाव रोहित कुमार वर्मा असे असून तो हातगाडीवर शेंगदाणे आणि चिक्की विकण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतो. 14 सप्टेंबर रोजी तो उदय नगरहून जात असताना आरोपींनी त्याला वाटेत अडवले. आरोपींनी त्याच्याकडून शेंगदाणे आणि चिक्की विकत घेतली. मात्र रोहितने त्याचे पैसे मागताच आरोपी त्याला शिवीगाळ करू लागले. त्याला धमकावत असतानाच आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून तिथून पसार झाले.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये न्यू सुभेदार ले-आऊट येथील खुशाल उर्फ कैरी मोहन पवैया, अयोध्या नगर येथील पूष्पेंद्र महेश कश्यप आणि सक्करदरा येथील कार्तिक महेंद्र कश्यप यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी कार्तिक याच्याविरोधात याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.