CAT 2026 अर्ज प्रक्रिया आज संपणार; एमबीए इच्छुक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणजेच CAT 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयआयएमने या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, १५ सप्टेंबर निश्चित केली आहे. ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरलेला नाही, त्यांनी वेळ न दवडता अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, कारण आजनंतर अर्जाची विंडो बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना यंदा ही परीक्षा द्यायची आहे, त्यांच्याकडे आता वेळ फार कमी उरला आहे.
पात्रतेबाबत बोलायचं झालं तर ओपन, EWS आणि NC-OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांसह ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. तर SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट किमान ४५% गुणांची आहे. याशिवाय ज्यांनी CA, CS, ICWA (CMA) किंवा Fellow of the Institute of Actuaries of India (FIAI) यासारखी व्यावसायिक पदवी ठरलेल्या टक्क्यांसह पूर्ण केली आहे, तेही अर्ज करू शकतात. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा आहे, म्हणजेच अजून पदवी पूर्ण न झालेले विद्यार्थीही या संधीचा लाभ घेऊ शकतात.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी उमेदवारांनी iimcat.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. होमपेजवर 'New Candidate Registration' या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर 'Registered Candidate Login' वर क्लिक करून बाकीचे तपशील भरायचे असतात. त्यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करून ठरलेली परीक्षा फी भरावी लागते. फॉर्म सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंटआऊट पुढील वापरासाठी जपून ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून भविष्यात कधी गरज पडली तर ती उपलब्ध असेल.
अर्ज फीबाबत सांगायचं तर SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना १,३५० रुपये भरावे लागतील. तर जनरल, OBC आणि EWS यांसारख्या इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना २,७०० रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी अर्ज प्रक्रियेचा भाग असून ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागते.
परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत अधिकृत माहितीनुसार, IIM CAT 2026 परीक्षा २९ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांचं प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड ४ नोव्हेंबर २०२६ पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यंदा CAT परीक्षा द्यायची आहे, त्यांनी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा आजनंतर अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.