गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:28 IST

ब्रह्मपुरीत विनापरवाना भरमार बंदुकीसह एकाला पोलिसांनी घेरून पकडले

मेंडकी ते गणेशपूर रस्त्यावर मध्यरात्री सापळा रचून ब्रह्मपुरी पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीची भरमार बंदूक जप्त केली आणि एकाला अटक केली.

ब्रह्मपुरीत विनापरवाना भरमार बंदुकीसह एकाला पोलिसांनी घेरून पकडले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी, ८ सप्टेंबरच्या रात्री एक मोठी कारवाई झाली. मेंडकी ते गणेशपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान पोलिसांनी सापळा रचून एका इसमाला विनापरवाना भरमार बंदुकीसह रंगेहात पकडले.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १२ हजार रुपये किमतीची जुनी वापरलेली भरमार बंदूक आणि दारूगोळा ठासण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेखालाल भैयालाल गौतम हे आपल्या पथकातील पोलीस हवालदार रतन लेनगुरे, शरद सावसाकडे आणि पोलीस शिपाई अमोल लोनबले, अभिषेक आगाशे व शुभम लेडांगे यांच्यासह मेंडकी पोलीस चौकीच्या हद्दीत खासगी वाहनाने गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. याच वेळी एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन मेंडकी ते गणेशपूर रस्त्याने पायी जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली. ही माहिती गंभीर असल्याचे लक्षात घेत उपनिरीक्षक गौतम यांनी लगेच पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांना कळवले आणि त्यांच्या सूचनेनुसार कारवाईची तयारी सुरू झाली.

पोलिसांनी मेंडकी परिसरातील वैभव यशवंत कुंभरे आणि प्रदीप वासुदेव गुरनुले या दोघांना पंच म्हणून सोबत घेतले आणि संशयिताचा शोध सुरू केला. स्मशानभूमीजवळ पोहोचताच खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाशी जुळणारा एक इसम पायी जाताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून त्याला घेरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अंबरसिंग बच्चनसिंग दुधानी (वय ४० वर्षे, मजुरी करणारा, रहिवासी रूपाळामेंढा/आकापूर, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर) असल्याचे सांगितले.

पंचांसमोर तपासणी केली असता त्याच्याकडे लाकडी बनावटीची आणि लोखंडी नळी असलेली मोठी भरमार बंदूक सापडली, जिचा त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता. जप्त केलेली बंदूक सुमारे १३२ सेंटिमीटर लांबीची असून त्यात ८७ सेंटिमीटरची लाकडी बॉडी, ९१ सेंटिमीटर लांबीचे व ८ सेंटिमीटर गोलाईचे लोखंडी बॅरल, लोखंडी हॅमर, ट्रिगर आणि बारूद ठासण्यासाठी लागणारा ८९ सेंटिमीटर लांबीचा लोखंडी रॉड असल्याचे आढळले.

विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पंचांसमोर पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि आरोपी अंबरसिंग दुधानी याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम यांच्या फिर्यादीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) १९५९ च्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ०७०० दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज ओमनराव शेलोकार यांच्याकडे सोपवण्यात आला असून, हे शस्त्र आरोपीने कुठून मिळवले आणि कोणत्या हेतूने बाळगले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ