BMW ची पहिली लोकल-मेड इलेक्ट्रिक सेडान i5 लाँग व्हीलबेस भारतात दाखल, किंमत 79.60 लाख रुपयांपासून
BMW India ने चेन्नईतील प्लांटमध्ये तयार होणारी i5 Long Wheelbase भारतात लाँच केली असून, 669 km रेंज आणि लांब व्हीलबेससह ही कंपनीची पहिली स्थानिक पातळीवर बनणारी इलेक्ट्रिक सेडान ठरली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
लक्झरी इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये BMW India ने एक मोठं पाऊल टाकलंय. कंपनीने i5 Long Wheelbase ही नवी इलेक्ट्रिक सेडान भारतात लाँच केली असून, तिची एक्स-शोरूम किंमत 79.60 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं उत्पादन चेन्नईतल्या BMW Group च्या प्लांटमध्ये लोकल लेवलवर होणार आहे, आणि भारतात असं स्थानिक उत्पादन होणारी ही BMW ची पहिलीच इलेक्ट्रिक सेडान आहे. कंपनीने याच किमतीत First Edition सुद्धा आणली होती, पण त्याच्या फक्त 99 युनिट्सच उपलब्ध होत्या आणि लाँचआधीच त्या सगळ्या विकल्या गेल्या.
BMW i5 eDrive35L M Sport ची लांबी 5,175 mm, रुंदी 2,156 mm आणि उंची 1,520 mm इतकी आहे. या गाडीचा व्हीलबेस 3,105 mm इतका लांब असल्याने मागच्या सीटवर बसणाऱ्यांना जास्त लेगरूम मिळतो. भारतीय रस्त्यांवर वापरताना अडचण येऊ नये म्हणून रिअर-एक्सल एअर सस्पेंशन आणि जास्तीचं ग्राउंड क्लीयरन्स दिलंय. बाहेरून बघितलं तर इल्यूमिनेटेड किडनी ग्रिल, अॅडॅप्टिव्ह LED हेडलॅम्प्स आणि 20-इंच M अलॉय व्हील्समुळे गाडी उठून दिसते.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर या गाडीत 81.6 kWh ची बॅटरी असून मागच्या बाजूला इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे. ही मोटर 268 hp पॉवर आणि 410 Nm टॉर्क देते, त्यामुळे i5 फक्त 6.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. गाडीचा टॉप स्पीड 195 kmph इतका आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका फुल चार्जमध्ये MIDC प्रमाणित रेंज तब्बल 669 km पर्यंत मिळते. 160 kW च्या DC फास्ट चार्जरने बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज व्हायला फक्त 33 मिनिटं लागतात.
केबिनच्या आत गेलं की 12.3-इंचाची डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्क्रीन आणि 14.9-इंचाचा टचस्क्रीन असलेला BMW Curved Display दिसतो. त्याशिवाय चार-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, Bowers & Wilkins चा ऑडिओ सिस्टम आणि वायरलेस Apple CarPlay-Android Auto सुद्धा मिळतो. मागच्या प्रवाशांच्या आरामावरही खास लक्ष दिलंय. Veganza vegan उपहोल्स्ट्री, व्हेंटिलेटेड कम्फर्ट सीट्स आणि Sky Lounge पॅनोरॅमिक रूफमुळे केबिनचा एकंदरीत अनुभव प्रीमियम वाटतो. रोजच्या वापरासाठी डिजिटल की प्लस आणि WiFi हॉटस्पॉटसारख्या सुविधाही देण्यात आल्यात.
सेफ्टीच्या बाबतीत Active Cruise Control, Parking Assistant Professional, Reverse Assistant, Lane Change Warning आणि Collision Warning ही फीचर्स दिली आहेत. स्टँडर्ड म्हणून 8 एअरबॅग्स दिल्या आहेत. गाडीसोबत ग्राहकांना 11 kW चा Wallbox चार्जर मिळतो, आणि बॅटरीवर 8 वर्षं किंवा 1,60,000 km ची वॉरंटी देण्यात आली आहे. या किंमत आणि फीचर्सच्या जोरावर i5 आता प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान सेगमेंटमधल्या इतर गाड्यांशी थेट स्पर्धा करणार आहे.