AI वापरून एका मिनिटात बनवा बाप्पांसोबतचा 80 च्या दशकातला रेट्रो फोटो, फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा
इंस्टाग्राम आणि X वर सध्या जुन्या अल्बमसारखा दिसणारा AI फोटो ट्रेंड चालू आहे, आणि गणेशोत्सव आल्यामुळे आता लोक बाप्पासोबतचा विंटेज लूकमधला फोटो बनवत आहेत.
इंस्टाग्राम उघडलं की सध्या एकच गोष्ट सगळीकडे दिसते आहे, ती म्हणजे 80 च्या दशकातल्या जुन्या अल्बमसारखा दिसणारा AI फोटो ट्रेंड. आई-वडील त्या काळात कसे दिसायचे किंवा आपण त्या काळात असतो तर कसे दिसलो असतो, हे सगळं आता AI मुळे शक्य झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून X आणि इंस्टावर हे रेट्रो फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत, आणि आता गणेशोत्सव आल्यामुळे याच ट्रेंडमध्ये बाप्पा पण सामील झाला आहे.
लोक स्वतःचा फोटो अपलोड करून बाप्पाच्या पायाशी बसलेला जुन्या काळातला, एकदम विंटेज आणि नॉस्टॅल्जिक लूकमधला फोटो बनवत आहेत. यासाठी मोठमोठी इंग्रजी प्रॉम्प्ट लिहायची गरज नाही, फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवल्या की एका मिनिटात फोटो तयार होतो.
पहिली गोष्ट म्हणजे चेहरा बदलणार नाही याची काळजी घेणे. AI मध्ये फोटो टाकल्यावर बऱ्याचदा चेहराच बदलून जातो आणि तुम्ही वेगळेच दिसायला लागता. हे टाळण्यासाठी AI ला फोटो देताना एकच ओळ लिहायची, "Preserve my exact facial features and identity", म्हणजे माझा चेहरा जसाच्या तसा ठेव. एवढं लिहिलं की ओरिजनल चेहरा तसाच राहतो.
दुसरी गोष्ट म्हणजे 80 च्या दशकातल्या अल्बमचा फील आणणे. जुन्या फोटोंमध्ये थोडा धूसरपणा, पांढरट-पिवळसर रंग आणि फोटोवर थोडी चमक असायची. हाच लूक आणण्यासाठी AI टूलमध्ये Vintage Filter किंवा Analogue Film Grain हा ऑप्शन निवडायचा, म्हणजे फोटो आताचा न वाटता जुन्या अल्बममधून स्कॅन केल्यासारखा वाटतो.
तिसरी गोष्ट म्हणजे कपडे आणि घराचं बॅकग्राउंड जुन्या काळातलं हवं. फोटोत टी-शर्ट आणि जीन्स घातली तर मजा जाते, त्यामुळे साधा सुती शर्ट, कुर्ता, महिलांसाठी पारंपारिक साडी आणि जुन्या स्टाईलचे केस हवेत. मागचं बॅकग्राउंडही साधं हवं, जसं पांढरी भिंत, दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण आणि कोपऱ्यात पितळी समई.
चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाची मूर्तीसुद्धा जुन्या काळातलीच हवी. आजकालच्या मोठ्या, डीजेवाल्या मूर्त्या नकोत. 80 च्या दशकात घरात असायची तशी साधी शाडूच्या मातीची, लाल रंगाची आणि डोक्यावर छोटा मुकुट असलेली सात्विक मूर्ती फोटोत असावी. तेव्हाच मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या जुन्या घरातल्या गणपतीची आठवण येईल.
फोटो बनवण्यासाठी अवघड काही करायची गरज नाही. PixelBin AI Trend Maker वर जायचं किंवा ChatGPT चं मोबाईल अॅप उघडायचं. तिथे प्लस (+) या बटनावर क्लिक करून चांगला सेल्फी अपलोड करायचा. त्यानंतर तिथे असलेल्या 1980s Vintage Template वर क्लिक करायचं, किंवा वर सांगितलेल्या 4 गोष्टी छोट्या शब्दात लिहायच्या. एवढं केलं की 10 ते 20 सेकंदात बाप्पासोबतचा रेट्रो फोटो तयार होतो, तो डाऊनलोड करून डीपी किंवा स्टेटसला लावता येतो.