मेटाचा नवीन VR चष्मा 'फिनिक्स' लीक; डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार स्क्रीन
मेटाच्या आगामी मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा फोटो आणि डिझाईन चुकून समोर आले असून, वजन आणि दिसण्यात हा डिव्हाईस आतापर्यंतच्या VR हेडसेटपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे दिसते.
मेटा कंपनीचा नवा डिव्हाईस बाजारात यायच्या आधीच त्याची माहिती बाहेर आली असून टेक जगात याचीच चर्चा सुरु आहे. 'प्रोजेक्ट फिनिक्स' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा फोटो आणि डिझाईन चुकून उघड झाले आहे. कंपनीने HorizonOS मधल्या प्रिस्क्रिप्शन लेन्स सॉफ्टवेअरचं अपडेट टाकलं होतं, आणि त्याच फाईल्समधून या नव्या चष्म्याचं ॲनिमेशन आणि डिझाईन बाहेर पडलं.
आतापर्यंत बाजारात असलेले मेटा Quest 3 किंवा Apple Vision Pro सारखे हेडसेट डोक्यावर घातले की जड वाटतात आणि आकारानेही मोठे असतात. तासभर वापरले तरी डोकं दुखायला लागतं, असा अनुभव अनेकांना येतो. पण लीक झालेल्या फोटोंमध्ये फिनिक्स हा हेडसेट रोजच्या वापरातल्या साध्या चष्म्यासारखा, खूप स्लिम आणि पातळ दिसतो आहे. यात चेहऱ्यावर बसणारा जाड फोमचा पट्टा नसेल, त्याऐवजी नाकावर टिकणारे छोटे नोज पॅड दिलेले असतील, त्यामुळे दिवसभर घातला तरी फारसा त्रास होणार नाही असं सांगितलं जातंय. या डिव्हाईसचं वजन 110 ग्रॅमपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
हेडसेट इतका हलका कसा बनवला, याचंही उत्तर या लीकमधून मिळतं. यात बॅटरी आणि प्रोसेसर थेट चष्म्यात न बसवता त्यासाठी एक वेगळा छोटा डब्बा दिला आहे, ज्याला Compute Puck असं नाव देण्यात आलं आहे. हा पॅक वायरने चष्म्याला जोडलेला असेल आणि तो खिशात ठेवता येईल किंवा बेल्टला लावता येईल. यामुळे डोक्यावर फक्त हलका चष्मा राहील आणि उर्वरित वजन खिशात राहील. या पॅकमध्ये क्वालकॉमचा नवा Snapdragon Reality Elite हा पॉवरफुल चिप बसवला जाणार आहे.
ज्यांना डोळ्याला नंबर आहे अशा वापरकर्त्यांसाठीही या लीकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. आतापर्यंत VR हेडसेटमध्ये चष्मा घालून बघणं अवघड जात असे, पण फिनिक्समध्ये स्वतःच्या नंबरचे लेन्स वेगळे बसवता येतील. फर्मवेअरच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोबाईलने QR कोड स्कॅन करून लेन्सचं सेटिंग करता येईल. या चष्म्याला कुठलंही रिमोट नाही, तर दोन्ही बाजूला आणि खाली छोटे सेन्सर्स आणि कॅमेरे बसवलेले आहेत. फक्त हाताने इशारा केला किंवा डोळ्यांनी बघितलं तरी स्क्रीन कंट्रोल होईल, म्हणजे हातात काहीही धरायची गरज उरणार नाही.
मेटाची दरवर्षी होणारी मोठी परिषद, Meta Connect, यंदा 24 आणि 25 सप्टेंबरला होणार आहे. या परिषदेत कंपनी फिनिक्सची पहिली झलक दाखवू शकते, पण हा चष्मा प्रत्यक्ष दुकानात विकायला यायला अजून वेळ लागेल. हा डिव्हाईस बाजारात 2027 पर्यंत येईल असं सांगितलं जातं आहे. गूगल आणि Xreal सारख्या कंपन्याही अशाच प्रकारचे हलके चष्मे बनवत असून, त्यांना टक्कर देण्यासाठी मेटाचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. 110 ग्रॅमचा हा चष्मा प्रत्यक्षात आला, तर VR आणि AR च्या दुनियेत मोठा बदल घडू शकतो.