क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
बीगॉस कंपनीच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एका चार्जमध्ये 178 किमीपर्यंतची रेंज, क्रूझ कंट्रोल आणि HyperZen इन-व्हील मोटर टेक्नॉलॉजीसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणाऱ्या बीगॉस कंपनीने आपली नवी स्कूटर बीगॉस सी12 मॅक्सर भारतीय बाजारात आणली आहे. रोजच्या वापराबरोबरच लांबच्या प्रवासासाठीही ही स्कूटर चालेल, अशा पद्धतीने तिची बांधणी केली गेली आहे. यात क्रूझ कंट्रोलसारखं फीचर दिलं गेलं आहे, जे साधारणपणे लांबच्या प्रवासात रायडरला उपयोगी पडतं. कंपनीच्या दाव्यानुसार एका फुल चार्जमध्ये ही स्कूटर तब्बल 178 किमीपर्यंत धावू शकते.
या स्कूटरमध्ये 3.8 kWh क्षमतेची LFP बॅटरी बसवली आहे. मोटर जास्तीत जास्त 4.2 kW इतकी पीक पॉवर देते आणि टॉप स्पीड 75 किमी/तासाहून जास्त असल्याचं सांगितलं जातंय. रायडरला गरजेनुसार Eco, Ride आणि Sport असे तीन राइडिंग मोड निवडता येतात. शिवाय पार्किंगच्या वेळी किंवा गर्दीच्या अरुंद जागेत स्कूटर सहज हाताळता यावी म्हणून रिव्हर्स मोडही दिला आहे.
या स्कूटरचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे कंपनीची HyperZen इन-व्हील मोटर टेक्नॉलॉजी. मोटर, गिअर, ब्रेक आणि मोटर कंट्रोल युनिट हे सगळं चाकाच्या हबमध्येच बसवलं गेल्यामुळे बाहेरून बेल्ट किंवा चेन लावायची गरज उरत नाही. अशी रचना असल्यामुळे स्कूटरची मेंटेनन्स करणंही तुलनेने सोपं होणार आहे, असं सांगितलं जातंय.
फीचर्सच्या बाबतीत बीगॉसने घरगुती वापर लक्षात घेऊन डिझाईन केलं आहे. सीटखाली दोन हेल्मेट मावतील इतकी स्टोरेज स्पेस मिळते, छत्रीसाठी वेगळा पॉप-आउट होल्डर आहे, फोन आणि बाटली ठेवायलाही वेगळी जागा दिली आहे. शिवाय वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगची सोयही आहे. सगळी आवश्यक माहिती एका जागी दिसण्यासाठी 5-इंच TFT डिस्प्ले बसवला आहे.
राइड क्वालिटी चांगली राहावी यासाठी स्कूटरला 12-इंच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स दिले आहेत. पुढच्या बाजूला हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फोर्क तर मागच्या बाजूला 5-स्टेप अॅडजस्टेबल नायट्रॉक्स गॅस-चार्ज्ड सस्पेन्शन बसवलं आहे. सेफ्टीसाठी 220 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. या स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स 160 mm असून ती 150 किलोपर्यंत वजन सहज वाहून नेऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
बीगॉस सी12 मॅक्सर स्पार्कलिंग वाइन विथ शॅम्पेन गोल्ड, टेरा ग्रीन विथ शॅम्पेन गोल्ड, पर्ल व्हाइट आणि सॅटिन ब्लॅक अशा चार प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार रंग निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.