भारताच्या गोलंदाजांची कमाल, अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला मोठा दणका दिला.
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना रंगला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच जेरीस आणलं आणि निम्मा संघ सात षटकांच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वंदे मातरम् वाजवण्यात आलं.
टॉस भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला आणि आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी त्याने सांगितलं की वैभव सूर्यवंशी आजच्या अंतिम अकरामध्ये नाही, तर जसप्रीत बुमराह संघात परत आला आहे. दुखापतीतून सावरून परतलेल्या अनेक खेळाडूंचा भारतीय संघात समावेश होता.
पहिल्याच षटकात बुमराहने आपली छाप पाडली. पहिल्या चेंडूवर वाईडसह ५ धावा दिल्यानंतर त्याने रहमानुल्लाह गुरबाजला बाद केलं, अभिषेक शर्माने कॅच घेतला. फक्त ५ धावांवर अफगाणिस्तानने पहिली विकेट गमावली. त्यानंतर सामना अफगाणिस्तानसाठी अवघड होत गेला. इब्राहिम झद्रान धावबाद झाला, त्याने १० चेंडूंत ११ धावा केल्या आणि ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या २ बाद ३८ झाली. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बुमराहने सेदिकुल्ला अटलचा झेल घेतला, त्याने १३ चेंडूंत १३ धावा केल्या होत्या. ५ षटकांनंतर अफगाणिस्तान ३ बाद ३९ अशा बिकट अवस्थेत होतं.
अक्षर पटेलने गुलबदिन नायबला अवघ्या २ धावांवर बाद केलं आणि संघ ४ बाद ४२ झालं. सातव्या षटकात वरुण चक्रवर्तीने दरबिश रसूलीला त्रिफळाचीत केलं, तो फक्त २ धावा करू शकला. अशा प्रकारे सात षटकांतच अफगाणिस्तानने पाच विकेट गमावल्या होत्या.
यानंतर मोहम्मद नबी आणि अजमतुल्लाह उमरजई यांनी डाव सावरत भागीदारी रचली आणि संघाला १०० धावांपुढे नेलं. अर्शदीपने नबीला बोल्ड केलं, पण अझमतने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. राशिद खान मैदानात आला, पण १० चेंडूंत फक्त १ धाव करून अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. अर्शदीपने अवघ्या १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. शेवटचं षटक श्रेयसने शिवम दुबेला दिलं, ते मात्र महागात पडलं. त्या एका षटकात अझमतने २१ धावा वसूल केल्या.
भारतीय संघात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश होता. तर अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि फजलहक फारूकी खेळत होते. भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.