बसपाकडे एकही आमदार-खासदार नाही, निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याच्या विचारात
उत्तर प्रदेशात एकेकाळी सरकार बनवण्याची ताकद असलेल्या बहुजन समाज पक्षाची घसरण सुरूच असून, निवडणूक आयोग आता त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आणि हत्ती हे निवडणूक चिन्हही काढून घेण्याच्या विचारात आहे.
उत्तर प्रदेशात एकेकाळी सरकार स्थापन करण्याइतकी ताकद असलेला बहुजन समाज पक्ष सध्या अस्तित्वाच्या मोठ्या संकटातून जातोय. प्रत्येक निवडणुकीगणिक पक्षाच्या मतांचा वाटा सातत्याने घसरत चाललाय, आणि याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून घोषित करण्याचा विचार करतोय.
निवडणूक आयोगाची नजर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. या निवडणुकीत बसपाची कामगिरी पुन्हा खराब राहिली, तर आयोग पक्षाला प्रादेशिक दर्जा देऊ शकतो. एवढंच नाही, तर पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेलं हत्तीचं चिन्हही बदललं जाऊ शकतं. त्याऐवजी उत्तर प्रदेशात प्रादेशिक पक्षांसाठी राखीव असलेल्या चिन्हांपैकी एखादं चिन्ह पक्षाला दिलं जाऊ शकतं. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात हा बसपासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
सध्याची परिस्थिती पाहिली, तर बहुजन समाज पक्षाकडे देशभरात एकही आमदार नाहीये. राज्यसभा किंवा लोकसभेतही पक्षाचा एकही खासदार नाही. बसपाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की कोणत्याही सभागृहात पक्षाचा एकही राजकीय प्रतिनिधी शिल्लक नाहीये.
पक्षाची अंतर्गत संघटनाही दिवसेंदिवस कमकुवत होत चाललीय. पक्ष पुढे कोणाच्या हाती सोपवावा, याबद्दल पक्षप्रमुख मायावती यांच्या मनात साशंकता आहे. सुरुवातीला त्यांनी पक्षाची सूत्रं आपला भाचा आकाश आनंद याच्याकडे दिली होती, पण नंतर त्याला सगळ्या पदांवरून हटवलं. आकाश आनंद पुन्हा पक्षात परतला खरा, पण यावेळी त्याचा राजकीय प्रवास फार काळ टिकला नाही. मायावतींनी त्याला पुन्हा पक्षातून आणि सगळ्या पदांवरून काढून टाकलं. आकाश आनंद त्याच्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून स्वतःला आणि पक्षाला कमकुवत करण्याचं काम करत असल्याचा आरोपही मायावतींनी केला.
यानंतर मायावतींनी पक्षाची सूत्रं आपली भाची दीपिका आनंदकडे सोपवण्याचे संकेत दिले. दीपिका ही आकाश आनंद आणि ईशान आनंद यांची बहीण असून सध्या लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेतेय. मात्र दीपिकाच्या कामावर लक्ष ठेवल्यानंतरच तिला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असंही मायावतींनी स्पष्ट केलंय.
बसपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मायावतींनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला, पण शेवटी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून कुटुंबातलीच व्यक्ती हवी आहे. पक्षात इतर दलित नेते नाहीत का, असा सवालही काही जण उपस्थित करतायत. तर काहींच्या मते, दीपिकाकडे सूत्रं सोपवून मायावतींनी योग्य निर्णय घेतलाय, कारण यामुळे बसपा एका महिलेच्या हातात जाईल. इतर कोणत्याही पक्षात दलित महिलेला इतकं मोठं पद आणि सन्मान मिळालेला नाही, आणि हे फक्त बसपातच शक्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दीपिका आनंद मायावतींच्या कुटुंबातली असली, तरी त्यानं फरक पडत नाही, असंही या कार्यकर्त्यांचं मत आहे.