बंगळुरूत बनावट कॅन्सर औषधांचा धंदा; ९० हून अधिक हॉस्पिटलं SIT च्या रडारवर, ५ कोटींचा माल जप्त
कर्करोगावरील आणि जीवरक्षक औषधांच्या बनावट धंद्याचा तपास बंगळुरू पोलिसांनी हाती घेतला असून, ९० हून अधिक हॉस्पिटल आणि दवाखान्यांना बनावट औषधं पुरवली गेली का, याची चौकशी सुरू आहे.
बंगळुरूमध्ये कर्करोगावरच्या आणि इतर जीवरक्षक औषधांच्या बनावट धंद्याचं मोठं रॅकेट समोर आलं असून, पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. शहरातील ९० हून अधिक हॉस्पिटल आणि दवाखान्यांना बनावट किंवा पुन्हा पॅक केलेली औषधं पुरवली गेली होती का, हे अधिकारी तपासत आहेत. बंगळुरू पोलिसांचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) आणि औषध नियंत्रण खात्याने संयुक्तपणे केलेल्या तपासात या नेटवर्कशी संबंधित असल्याच्या संशयावरून फार्मसी मालक वीरेश कुमार जैन याला अटक केली आहे.
मिनर्व्हा सर्कलजवळच्या कृपा हेल्थकेअर या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या तपासाला वेग आला. तिथून मोठ्या प्रमाणात संशयास्पद बनावट औषधं जप्त करण्यात आली. औषधांची साठवणूक आणि वाटप याच जागेतून केलं जात होतं, असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. या नेटवर्कमधून हॉस्पिटल, क्लिनिक आणि मेडिकल दुकानांना कर्करोगाची औषधं, जीवरक्षक औषधं आणि ICU इंजेक्शन्स पुरवली जात होती, असा आरोप आहे.
तपास करणाऱ्यांच्या माहितीनुसार, ही औषधं जवळपास ५० टक्के सवलतीत दिली जात होती. स्वस्तात औषधं मिळवून ती वेगळ्या नावाने पुन्हा ब्रँड करायची आणि नंतर जास्त किमतीत विकायची, अशी या रॅकेटची पद्धत असल्याचा संशय आहे. एक्स्पायरी झालेली औषधं नव्या डब्यांमध्ये पॅक करून त्यावर बनावट लेबलं लावली जात होती, असाही आरोप आहे. यातली काही लेबलं मोठ्या औषध कंपन्यांच्या ब्रँडिंगसारखी दिसत होती, असं तपास करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
ही औषधं मेडिकल दुकानं, हॉस्पिटल आणि क्लिनिकपर्यंत पोहोचवायला मदत केल्याचा संशय १५ हून अधिक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हवर आहे. हे रॅकेट आंतरराज्यीय पातळीवर पसरलं होतं का, हेही तपासलं जात आहे. पोलीस सहआयुक्त (पश्चिम) आणि SIT प्रमुख वामसी कृष्णा यांनी सांगितलं की, या नेटवर्कचा नेमका पसारा किती मोठा आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
पैशांची आणि औषधांची देवाणघेवाण नेमकी कशी झाली, हे शोधण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेले बँक व्यवहार, खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि इतर कागदपत्रं तपासायला सुरुवात केली आहे. वीरेश कुमार गेली पाच वर्षं ही संस्था चालवत होता, असा पोलिसांना संशय आहे. त्याचा प्रशांत नावाच्या व्यक्तीशी संबंध असल्याचं समोर आलं असून, प्रशांत हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे प्रकरण १८ ऑगस्ट रोजी बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातल्या बिदादी आणि दोडडेरी भागातल्या एका फार्महाऊसवर टाकलेल्या धाडीपासून सुरू झालं. या कारवाईत जवळपास ५ कोटी रुपयांची संशयास्पद बनावट औषधं जप्त झाली होती. सोबतच बनावट बिलं, इंजेक्शन भरायची उपकरणं आणि बनावट लेबलंही सापडली होती.
फार्महाऊसवरच्या कारवाईनंतर तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली. कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतल्या १० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली. याच तपासादरम्यान कृपा हेल्थकेअर आणि वीरेश कुमार यांचं नाव समोर आलं.
आता SIT आणि औषध नियंत्रण खातं या संशयास्पद औषधांचा पुरवठा नेमक्या कोणत्या हॉस्पिटल, क्लिनिक आणि वैद्यकीय संस्थांना झाला, याची माहिती गोळा करत आहेत. या औषधांचा प्रत्यक्ष वापर रुग्णांवर झाला होता का आणि या रॅकेटचं जाळं किती मोठं आहे, हे तपास पुढे गेल्यावर स्पष्ट होईल. सध्या या प्रकरणात फक्त वीरेश कुमारला अटक झाली असून, फरार प्रशांतचा शोध सुरू आहे.