केस चमकदार करण्यासाठी मेथी दाणे की अंडं, कोणता घरगुती मास्क ठरतो जास्त फायदेशीर
ग्लास हेअर लुकसाठी मेथीचे दाणे आणि अंड्याचा मास्क दोन्ही वापरले जातात, पण दोघांचा केसांवर वेगवेगळा परिणाम होतो.
सध्या चमकदार आणि मऊ केसांची क्रेझ खूप वाढलेली दिसतेय. याला 'ग्लास हेअर' असं म्हणतात. यात केस इतके गुळगुळीत आणि चमकदार दिसतात की जणू आरशासारखे भासतात, आणि हा लुक मिळवण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. यासाठी नियमित कंडिशनिंग, बरोबर स्टायलिंग आणि उष्णतेपासून केसांचं संरक्षण गरजेचं असतंच, पण त्याचबरोबर घरातल्या काही साध्या गोष्टीदेखील केसांना काही काळासाठी चमक देऊ शकतात. यातले दोन लोकप्रिय पर्याय म्हणजे मेथीचे दाणे आणि अंडं. हेअर मास्क म्हणून दोन्हीचा वापर होतो, पण काचेसारखा लूक हवा असेल तर नेमकं कोणतं जास्त उपयोगी पडतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
मेथी हा केसांच्या काळजीसाठी उत्तम मानला जाणारा घटक आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये असे अनेक नैसर्गिक घटक असतात जे केसांना फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले की त्यावर जेलसारखा चिकट थर तयार होतो, आणि हाच थर कंडिशनरचं काम करतो. या मेथीच्या पेस्टचा वापर केल्यावर केसांवर एक प्रकारचं आवरण तयार होतं, ज्यामुळे केस धुतल्यानंतर मऊ आणि सांभाळायला सोपे वाटतात. केसांचा बाहेरचा थर म्हणजे क्यूटिकल जेव्हा गुळगुळीत असतो, तेव्हा त्यावरून प्रकाश जास्त चांगल्या पद्धतीने परावर्तित होतो, आणि यामुळेच केस चमकदार दिसू लागतात. मात्र मेथीमुळे केसांची कायमची दुरुस्ती होत नाही, तिचा परिणाम तात्पुरत्या गुळगुळीतपणा आणि चमकेपुरताच मर्यादित राहतो.
दुसरीकडे अंड्यांमध्ये प्रथिनं आणि अमिनो ॲसिड असल्यामुळे अनेक घरगुती हेअर मास्कमध्ये अंड्याचा वापर केला जातो. पण अंडी खाणं आणि कच्चं अंडं थेट केसांना लावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. केसांमध्येही प्रथिनं असतात, त्यामुळे कच्चं अंडं लावलं म्हणजे खराब झालेले केस लगेच दुरुस्त होतील असं नाही. जर अंड्याचा मास्क वापरायचा असेल तर एक अंडं, एक मोठा चमचा दही आणि एक छोटा चमचा कोरफड जेल एकत्र घेऊन नीट मिसळावं. हे मिश्रण ओल्या केसांना मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावावं आणि पंधरा ते वीस मिनिटं तसंच ठेवावं. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवावेत आणि शॅम्पू-कंडिशनर लावावा.
मग नेमका कोणता मास्क वापरायचा, हा प्रश्न साहजिकच पडतो. जर उद्देश केस चमकदार, मऊ आणि रेशमी बनवण्याचा असेल तर मेथीचा हेअर मास्क चांगला पर्याय ठरतो, कारण तो कंडिशनरसारखं काम करून तात्पुरता ग्लासी लुक देतो. पण ज्यांचे केस खूप कमकुवत, खराब झालेले किंवा तुटण्याची शक्यता असलेले आहेत, त्यांच्यासाठी घरगुती अंड्याच्या मास्कपेक्षा प्रोटीन ट्रीटमेंट किंवा बाजारातला हेअर मास्क वापरणं जास्त उपयोगी ठरू शकतं. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घेणं आणि हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणं योग्य राहील.