बल्लारशाहजवळ गुप्तधनासाठी अघोरी विधी, महिलेसह नऊ जणांना अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर शिवारात नदीकाठी मध्यरात्री गुप्तधनाच्या शोधासाठी जादूटोणा करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी पकडले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह पोलिसांनी विसापूर शिवारात गुप्तधनाच्या शोधात अघोरी पूजा करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा डाव उधळून लावला. नदीकाठच्या निर्जन शिवारात मध्यरात्री सुरू असलेल्या या कारस्थानात एका महिलेसह एकूण नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई यशस्वी होण्यामागे स्थानिक नागरिकांची सतर्कता कारणीभूत ठरली.
पकडलेल्या आरोपींमध्ये नागपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना घडली ती ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री साधारण १२ वाजता. MH-40-CX-4616 क्रमांकाची एक संशयास्पद चारचाकी गाडी विसापूर गावाजवळील नदीच्या दिशेने जाताना स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडली. गाडीत काही पुरुष आणि एक महिला संशयास्पद पद्धतीने बसलेले दिसले. ही मंडळी नदीकाठच्या शेतशिवारात गुप्तधन शोधण्यासाठी किंवा अघोरी जादूटोणा करण्यासाठी निघाल्याचा संशय आल्याने विसापूरच्या काही जागरूक नागरिकांनी गाडीवर लक्ष ठेवले आणि तातडीने विसापूर पोलीस चौकीतील हवालदार माहूरकर यांना ही माहिती दिली.
रात्रपाळीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे यांनी लगेच ही बातमी बल्लारशाहचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच इंगळे पोलीस पथकासह शासकीय वाहनाने विसापूर-कोलगाव फाट्यावर दाखल झाले, जिथे स्थानिक नागरिक आधीच त्या गाडीची वाट पाहत थांबले होते. काही वेळातच कोलगाव-विसापूर मार्गावरून ती गाडी गावाच्या दिशेने परत येताना दिसली. पोलिसांनी वाहन अडवून प्रवाशांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी वाहनातील सात पुरुष आणि एका महिलेला पुढील चौकशीसाठी बल्लारशाह पोलीस स्टेशनमध्ये आणले.
घटनास्थळाची पाहणी केली असता नदीकाठच्या निर्जन शिवारात गुप्तधनासाठी अघोरी पूजा आणि खड्डा खोदण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत या टोळीचे संपूर्ण जाळे आणि प्रत्येकाची ठरलेली जबाबदारी उघड झाली. देवागन विक्रम सहारे (वय ४२, रा. हिंगणा, नागपूर) हा या टोळीचा म्होरक्या असून त्यानेच सर्वांना एकत्र आणले होते. राजुरा तालुक्यातील रामपूरचा फरार आरोपी शांताराम हिंगणे याने आपल्या शेतात गुप्तधन असल्याचे सांगून देवागनला जागा दाखवण्याचे आमिष दिले होते. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावचा मांत्रिक श्यामराव नत्थु आत्राम (वय ५९) याला बोलावण्यात आले होते. विधीच्या वेळी महिलेची उपस्थिती आवश्यक असल्याने नागपूरची दिपाली दुर्गेश ढवराळ (वय ४०) हिला सोबत आणले होते; तिला गुप्तधनाच्या विधींची पूर्ण माहिती असल्याचे तिने स्वतः मान्य केले.
खड्डा खोदण्यासाठी नरेंद्र बाबुराव राऊत (वय ५०, रा. नागपूर) आणि किशोर नानाजी नैताम (वय ५१, रा. यवतमाळ), माती उपसण्यासाठी अमोल रामदास राऊत (वय ३२, रा. हिंगणघाट, वर्धा), गुप्तधनाच्या आशेने आलेला गणेश भदू झाडे (वय ३३, रा. कुही, नागपूर), पूजेचे साहित्य पुरवणारा राहुल सदाशिव खेडेकर (वय ३३, रा. आर्वी, ता. राजुरा) आणि नागपूरहून सर्वांना गाडीने घेऊन येणारा चालक राम बाबाराव काळे (वय ४२, रा. नागपूर) यांचीही कामे आधीच ठरलेली होती.
बल्लारशाह पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपीन सुभाष इंगळे यांच्या तक्रारीवरून म्होरक्या देवागन सहारे, मांत्रिक श्यामराव आत्राम, दिपाली ढवराळ यांच्यासह नऊ आरोपी आणि फरार शांताराम हिंगणे अशा एकूण दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३(२) आणि ३(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशा अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.