बैलपोळा विदर्भाचा महाउत्सव ठरेल - मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे वर्ध्यात प्रतिपादन
वर्ध्यात रामनगर बैल पोळा व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे भाषण; पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचीही उपस्थिती.
वर्ध्यात शेतकऱ्यांच्या बैलजोडीचा सन्मान करणारा बैलपोळा उत्सव पुढच्या काळात विदर्भाचा मोठा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी मांडले. शहिद भगतसिंग व्यायाम शाळा आणि रामनगर बैल पोळा उत्सव समितीने आयोजित केलेल्या बैल पोळा व कृषी प्रदर्शनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भोसले म्हणाले की, शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो आणि त्याच्यासोबत त्याची बैलजोडीही तितकीच मेहनत घेत असते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत या बैलजोडीचे मोठे योगदान आहे. राजमाता जिजाऊ यांनी या बैलजोडीचे महत्त्व ओळखले होते आणि त्याच परंपरेतून विदर्भात मोठ्या प्रमाणात बैलपोळा साजरा केला जातो. पुढच्या पिढीने या सणामागचा अर्थ समजून घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी शिवाजी महाराज पुतळा चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाची मागणी केली होती, त्यासाठी लवकरच 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन शिवेंद्रसिंह भोसले यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला जातो. बैलजोड्या शेतात कष्ट करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. पुढे कृषी प्रदर्शनी अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाने राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी दिली असून त्याचा फायदा जिल्ह्यातील 33 हजार शेतकऱ्यांना झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली आहे. महिला शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली असून गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजनेतून राज्यातील 2 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात असून बळीराजा शेत पांदनरस्ता योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. पुढील 20 वर्षांत शेतकरी कसा समृद्ध होईल, याचा रोडमॅप तयार करण्यात आल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, संतोष ठाकूर, शुभांगी कोलते, वंदना भुते, निलेश किटे आणि बैल पोळा समितीचे अध्यक्ष नरेश गुजर उपस्थित होते. सुधीर पांगुळ व संजय गाते यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनीची फित कापण्यात आली आणि बैलजोडीची पूजा करून बैलपोळ्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.