Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
तेलाच्या दरवाढीने बाजारात खळबळ, १० वर्षाच्या बॉण्ड यिल्डने गाठली ५ टक्क्यांची पातळी, फेडच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती वाढत असून त्याचा फटका आता अमेरिकेच्या बॉन्ड बाजाराला बसताना दिसतोय. अमेरिकेच्या दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील यिल्ड ५ टक्क्यांच्या पुढे गेलं असून ही पातळी २००७ मधील जागतिक आर्थिक संकटानंतरची सर्वोच्च पातळी ठरली आहे. म्हणजेच जवळपास दोन दशकांत अमेरिकेच्या दहा वर्षांच्या रोख्यांवरील यिल्ड एवढ्या उंचीवर याआधी कधीच गेलं नव्हतं.
वाढत्या महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवला जाऊ शकतो, असा अंदाज बाजारातील गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. या अंदाजामुळेच बाजारातल्या हालचालींना वेग आला आहे.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे तेलाचे दर पुन्हा वाढत असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर महागाईचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. तेलाच्या किमती वाढल्या की पेट्रोल, डिझेल, वाहतूक आणि उत्पादन खर्चावर त्याचा परिणाम होतो. याचा थेट फटका ग्राहकांच्या खर्चाला आणि कंपन्यांच्या उत्पादन खर्चाला बसू शकतो. त्यामुळे महागाई आणखी वाढेल अशी भीती गुंतवणूकदारांना सतावते आहे. या चिंतेमुळेच बॉन्ड बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसतोय.
अमेरिकेच्या दहा वर्षांच्या ट्रेझरी बॉन्डवरील यिल्ड मंगळवारी ५.०२ टक्क्यांपर्यंत पोहोचलं, तर नंतर ते ५.०४ टक्क्यांच्या आसपासही गेलं. २००७ नंतर एवढी उच्च पातळी पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. बॉन्ड यिल्ड वाढणं म्हणजे सरकारसाठी कर्ज घेण्याचा खर्च वाढणं. याचा परिणाम पुढे कंपन्यांच्या कर्जावर आणि ग्राहकांच्या कर्जाच्या खर्चावरही होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाढत्या व्याजदराचा दबाव तयार होण्याची शक्यता आहे. साहजिकच सरकार, कंपन्या आणि सामान्य नागरिक अशा सगळ्यांनाच याचा फटका बसू शकतो.
तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्हसमोर मोठी कोंडी निर्माण झाली आहे. बाजारातल्या व्यवहारांवरून फेडकडून व्याजदर वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जातेय. व्याजदर वाढला तर महागाई नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते, पण त्याचवेळी कर्ज महाग होऊन आर्थिक वाढीवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे फेडचा येणारा निर्णय फक्त अमेरिकेसाठीच नाही, तर जागतिक बाजारासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेच्या बॉन्ड यिल्डमधली ही वाढ शेअर बाजार, डॉलर आणि इतर देशांच्या कर्जबाजारावरही परिणाम करू शकते. त्यामुळे पुढच्या काळात फेडचा निर्णय आणि तेलाच्या किमतींची दिशा यावर जगभरातल्या बाजारांचं लक्ष लागून राहणार आहे.