AI फोटो ॲप्समुळे चेहरा आणि वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका, वापरकर्त्यांना सावधगिरीचा इशारा
इंटरनेटवर १९८० च्या दशकातील इयरबुक पोर्ट्रेटसारखे AI फोटो तयार करण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे, पण या मागे बायोमेट्रिक डेटा चोरीचा मोठा धोका दडलेला आहे.
सध्या इंटरनेटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून स्वतःचे फोटो १९८० च्या दशकातील इयरबुक पोर्ट्रेटसारखे बनवण्याचा ट्रेंड झपाट्याने पसरतोय. लोक कसलाही विचार न करता आपले फोटो अशा ॲप्सवर टाकतायत. वरवर बघता हा एक साधा आणि निरुपद्रवी छंद वाटतो, पण सायबर सुरक्षेच्या नजरेतून बघितलं तर या फोटोंच्या मागे एक मोठा डिजिटल सापळा लपलेला आहे, जो प्रत्येक युजरने समजून घ्यायला हवा.
जुने फोटो फिल्टर तुमच्या फोटोवर फक्त रंगाचा एक लेयर टाकायचे, त्यामुळे तुमची खरी ओळख सुरक्षित राहायची. पण आजचे मॉडर्न जनरेटिव्ह एआय मॉडेल्स तुमच्या चेहऱ्याची रचना, डोळ्यांच्या बाहुलीचा रंग आणि चेहऱ्यावरची प्रत्येक बारीक गोष्ट बारकाईने स्कॅन करतात. फोटो अपलोड करताना तुम्ही नकळत आपला बायोमेट्रिक डेटा या टेक कंपन्यांना फुकटात देत असता. पासवर्ड लीक झाला तर तो लगेच बदलता येतो, पण चेहरा आणि बायोमेट्रिक्स कधीच बदलता येत नाहीत. पुढे जाऊन या डेटाचा गैरवापर करून तुमची ओळख चोरली जाऊ शकते, आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा तुमच्या नावाने डीपफेक व्हिडिओ बनवले जाऊ शकतात.
हा धोका फक्त मोठ्या नावाजलेल्या एआय ॲप्सपुरता मर्यादित नाही. एखादा फिल्टर व्हायरल झाला की प्ले स्टोअरवर शेकडो बनावट आणि संशयास्पद ॲप्सही समोर येतात. हे ॲप्स फोटो बदलण्याच्या नावाखाली फोनची गॅलरी, कॉन्टॅक्ट लिस्ट, मायक्रोफोन आणि थेट लोकेशनचा ॲक्सेस मागतात. काही ॲप्समध्ये असा कोड असतो जो कीबोर्डवरच्या बोटांच्या हालचाली रेकॉर्ड करतो, त्यामुळे नेट बँकिंगचा पासवर्ड चोरीला जाण्याची शक्यता असते. यावर विश्वास बसणं कठीण वाटलं तरी, वैयक्तिक फोटोंमध्ये लपलेला मेटाडेटा सायबर गुन्हेगारांना तुमच्या घराचं अचूक जीपीएस लोकेशनही देऊ शकतो.
हे सगळे एआय फिल्टर आणि विचित्र ट्रेंड काही दिवसांत किंवा आठवड्यांत फीडवरून गायब होतील, लोक नव्या ट्रेंडकडे वळतील आणि जुने फोटो इतिहासजमा होतील. पण एकदा बायोमेट्रिक डेटा कंपन्यांच्या सर्व्हरवर आणि सायबर गुन्हेगारांच्या हातात गेला की तो कधीच डिलीट होत नाही. त्यामुळे सावध राहा, कारण इंटरनेटवर जे फुकट दिसतं त्याची किंमत शेवटी मोजावीच लागते.
इंटरनेटवर जे सर्व्हिसेस मोफत दिसतात, त्या कंपन्यांचं सगळ्यात मोठं बिझनेस मॉडेल असतं. अपलोड केलेले फोटो ते स्वतःच्या एआय मॉडेल्सना ट्रेनिंग द्यायला वापरतात किंवा डेटा ब्रोकर्सना विकतात. बरेच ॲप्स सुरुवातीला दोन, तीन किंवा पाच फोटो मोफत देतात आणि नंतर चांगल्या रिझल्टसाठी सबस्क्रिप्शन चार्ज घेतात. इतकंच नाही, तर तुम्हाला टार्गेटेड जाहिराती दाखवण्यासाठी तुमचं वय, लिंग आणि लोकेशनचा डेटा जाहिरात एजन्सींना विकला जातो.
सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ChatGPT किंवा दुसरं कुठलंही एआय टूल वापरताना सेटिंग्जमध्ये जाऊन मॉडेल ट्रेनिंगची परवानगी बंद करावी, म्हणजे कंपनी तुमच्या फोटोंचा वापर करून त्यांची सिस्टीम ट्रेन करू शकणार नाही. खरा फोटो अपलोड करण्याऐवजी फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट्स वापरावेत, त्यामुळे एआय तुमचा खरा चेहरा लपवून एक आभासी चेहरा तयार करेल. फोटो अपलोड करायचाच असेल तर फोनच्या गॅलरी सेटिंग्ज किंवा दुसऱ्या टूलने त्यातला मेटाडेटा, म्हणजे लोकेशन आणि डिव्हाइसची माहिती काढून टाकावी. आणि अनधिकृत ॲप्ससाठी कॅमेरा, स्टोरेज आणि लोकेशनचा ॲक्सेस लगेच ब्लॉक करावा.